Dev Kohli Passed Away : ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी (26 ऑगस्ट 2023) वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


सर्व उपचार करुनही देव कोहली यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 10 दिवसांपूर्वी प्रकृतीत सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवले होते. देव कोहली यांचे आज पहाटे चार वाजता झोपेतच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.


100 हून अधिक सिनेमांचे गीतकार देव कोहली...


देव कोहलीने 'लाल पत्थर', 'मैंने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'बाजीगर', 'जुडवा 2', 'मुसाफिर', 'इश्क', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'टॅक्सी नंबर 911' सारख्या शेकडो सुपरहिट सिनेमांची गाणी लिहिली आहेत. देव कोहली यांनी सलमान खानच्या (Salman Khan) 'मैंने प्यार किया' या ब्लॉकब्सटर सिनेमातील 'कबूतर जा जा', 'आज शाम होने आयी', 'आते जाते हाथते', 'काहे तोसे सजना' यांसारखी सुपरहिट गाणी लिहिली आहेत.






देव कोहली यांनी 'लाल पत्थर' सिनेमातील 'गाता हूं मैं'; 'हम आपके हैं कौन'मधील माई ना माई मुंडेर पर तेरी बोल रहा है कागा, 'बाजीगर' सिनेमातील 'काली आंखें', 'जुडवा 2' सिनेमातील 'चलती है क्या नौ से बारह', 'मुसाफिर'मधील 'ओ साकी साकी' अशी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राम लक्ष्मणपासून अन्नू मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज आनंदपर्यंत अनेक बड्या संगीतकारांसोबत काम केले होते.


देव कोहली यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार


देव कोहली यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या लोखंडवाला येथील घरी दुपारी दोन वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे. तसेच आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देव कोहली यांचे निधन त्यांच्या घरी झाले असले तरी मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


संबंधित बातम्या


Milind Safai Passed Away : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी