औरंगाबाद : लातूर जिल्ह्यातून उदगिर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. पण जिल्हा विभाजनाच्या चर्चेत कुठलंही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांना या संदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतात. कधीकधी त्या बातम्यांमध्ये तथ्य नसतं, उदाहरणार्थ 28 नवे जिल्हे होणार. हे कुणी सांगितलं, कधी चर्चा झाली, कोण बोलतंय? आम्ही सगळे यात नवीन आहोत, कुठेही याबद्दल चर्चा नाही, असं पवार म्हणाले.


पवार पुढे म्हणाले की, काही भागातले लोक आमच्या जिल्ह्याचे विभाजन करा मागण्या करतात. मात्र एक जिल्हा तयार करण्यासाठी नवा अस्तित्वात आणण्यासाठी सरकारला साडे सातशे ते एक हजार कोटी रुपये लागतात. कुणाच्या मनात काहीतरी कल्पना येते आणि ते लोकं ते मांडतात. याचा आणि सरकारचा दुरान्वये संबंध नाही, असं ते म्हणाले. मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना देखील याची कुठलीही कल्पना नाही. वेगवेगळ्या भागातून जिल्हा निर्मितीच्या मागण्या येत असतात पण आर्थिक परिस्थिती पाहून हे ठरवावे लागते. त्यामुळे या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये तथ्य नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.


लातूर जिल्ह्याच्या विभाजनाच्या हालचाली सरु झाल्या आहेत, अशा चर्चा आहेत. लातूर जिल्ह्याचं विभाजन होऊन उदगीर हा नवा जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु झाली आहे. 10 जानेवारीला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मिती संबंधी चर्चा झाली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आलाय. तसेच प्रशासकीय इमारतीसाठी काम गतिमान करण्याच्या सूचनाही करण्यात आलीय.

दरम्यान राज्याच्या इतर भागातूनही आता नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागणीचा जोर वाढलाय. बीडमधून अंबाजोगाई, नाशिकमधून मालेगाव, चंद्रपूरमधून चिमूर-ब्रह्मपुरी आणि नगरमधून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची मागणी होताना दिसत आहे.

दुसरीकडे अमरावती जिल्ह्याचं विभाजन करण्यासाठी मंत्री बच्चू कडू आग्रही असल्याची माहिती आहे. नवीन अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी त्यांनी केली आहे. तर सध्या राज्यातल्या 22 जिल्ह्यांकडून विभाजनाची इच्छा व्यक्त होत आहे. यात नाशिकामधून मालेगाव जिल्हा वेगळा करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या सर्व चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

या जिल्ह्यातूनही होतेय मागणी -
लातूरनंतर अनेक जिल्ह्यातून आता नवीन जिल्ह्याची मागणी होत आहे.
बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी होतेय.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला जिल्हा करण्याची मागणी.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावची मागणी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर किंवा ब्रह्मपुरी जिल्हा तयार करावा, अशी मागणी आहे.
पुणे जिल्ह्यातूनही इंदापूर किंवा बारामती, असा वाद सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी जिल्ह्याची मागणी होत आहे.
ठाणे जिल्ह्याचे तर चार जिल्ह्यात विभाजनाची मागणी आहे.
अहमदनगरमध्येही शिर्डी आणि श्रीरामपूर जिल्ह्याची जुनी मागणी आहे.