लातूर : लातूर जिल्ह्यातून नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. लातूरमधून नवीन उदगीर जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. उदगीर नवीन जिल्हा निर्मितीचा आणि प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उदगीर लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील हे शहर आहे. लातूरपासून 70 किलोमीटर अंतरावरील उदगीर हे शहर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मागील अनेक वर्षांपासून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संघटना यांनी सातत्याने उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 9 आणि 10 जानेवारीला औरंगाबाद येथे राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मितीसंबंधी चर्चा झाली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. तसेच प्रशासकीय इमारतीसाठीचं काम गतीमान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते.
उदगीर जळकोट अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील तीन तालुके आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. या बातमीनंतर उदगीर जळकोट आणि अहमदपूर येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. उदगीर ते अहमदपूर अंतर 32 किलोमीटर आहे. उदगीर ते जळकोट अंतर हे 25 ते 30 किलोमीटरपेक्षा कमी आहे. लोहा कंधार हे दोन तालुकेही उदगीरच्याजवळ आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी उदगीर हे सोयीस्कर ठिकाण होऊ शकतं. उदगीर जिल्हा निर्मिती करताना नेमक्या कोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.