Corona Vaccination : कोविड -19 विरुद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 कॉल सेंटर - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे.

Continues below advertisement

पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, कोविड 19 साथीचे रोग आणि लसीकरणाविषयी माहिती मिळावी यासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू केले आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीकरणाबाबत विविध माहिती साठी 1075 हा नंबर सर्वांसाठी देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जातील. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. हा लसीकरण कार्यक्रम लसीकरण करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या टप्प्यात ही लस मिळेल.

लसीकरण कार्यक्रमात को-विन हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म वापरला जाईल, ज्यायोगे लसीचा साठा, साठवणूक करण्यासाठी आवश्यक तापमान याबाबत वास्तविक माहिती आणि कोविड-19 लसीसाठी लाभार्थींचा वैयक्तिकरित्या मागोवा घेण्यास मदत होईल. हा डिजिटल प्लॅटफॉर्म लसीकरण सत्र आयोजित करताना सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या पुरेशा मात्रा यापूर्वीच देशभरातील सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने त्या पुढे जिल्ह्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. लोक सहभागाच्या तत्त्वांवर कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.