Akola News अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. यात अकोल्याच्या (Akola News) शालेय पोषण आहाराच्या मसाल्यामध्ये चक्क मसाल्याच्या सिल पॅकेटमध्ये मृत पाल आढळलीये. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलाय. काल, गुरुवारी  दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय. 


दरम्यान, मृत पाल आढळल्याचा मुद्दा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत प्रचंड गाजलाय. सत्ताधारी वंचितचे जिल्हा परिषद सदस्य रामकुमार गव्हाणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. जिल्ह्यात पूरवठा केलेला शालेय पोषण आहाराचा पुरवठा परत बोलावून घ्या आणि तात्काळ शालेय पोषण आहार थांबवण्यात यावा, अशी मागणी गव्हाणकरांनी सभागृहात केलीय. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जात आहे, आणि शालेय पोषण आहार मसाला पूरवठा करणाऱ्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचा अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहात दिलीय.


पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?


दरम्यान, राज्यात सतत घडणाऱ्या या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार म्हणून देण्यात येणारं पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?  शाळेत मध्यान्ह भोजनाचा भाग असलेला आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ खेळला जातोय का? की एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच या प्रकाराला आळा बसणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये पोषण आहारात मृत साप आढळला होता. तर त्यानंतर  उंदराची विष्ठाही आढळून आली होती. तर तिकडे वाशिम, यवतमाळ, अमरावती मध्ये मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे प्रशासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी फोल ठरली असल्याने ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर दुसरीकडे यातून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही बळावली आहे.


विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर


शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केलं जातय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.


हे ही वाचा