मुंबई : देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण पेटलेले आहे. देशभरात एकीकडे CAA आणि NRC च्या विरोधात मोर्चे आंदोलनं केली जात असताना दुसरीकडे या दोन्ही कायद्याच्या समर्थनार्थ देखील मोर्चे निघत आहेत. अजूनही  CAA आणि NRC च्या संदर्भात अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत.  CAA आणि NRC च्या मुद्द्यावरुन खासकरून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण आहे. यामध्ये गैरसमजातून अनेक ठिकाणी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. असाच प्रत्यक्ष मुंबईतील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील आला आहे.


मुंबईतील डोंबिवलीच्या रॉयल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक चमू NSS (National Service Scheme) राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पसाठी भिवंडी शहरातील पडगा परिसरात गेला होता. पडगा परिसरातील बोरिवली गावात या कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प हाती घेतला होता.  रॉयल कॉलेजचे NSS चे 25 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 23 डिसेंबर रोजी सात दिवसांच्या या कॅम्पसाठी रवाना झाले. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत चार ते पाच प्राध्यापक देखील होते. यांचा बेस कॅम्प पडगा परिसरातच बनवला होता.

रॉयल कॉलेजच्या एनएसएस टीमनं या प्रकल्पांतर्गत महिला सशक्तीकरणावर एक सर्वेक्षण घेण्याचं ठरवलं. या सर्वेक्षणाच्या अंतर्गत एनएसएसचे विद्यार्थी प्रत्येक घरी जाऊन काही प्रश्न विचारत होते. विद्यार्थ्यांना महिला सशक्तीकरण (women Empowerment) या विषयाच्या संदर्भात प्रश्नावली तयार करून देण्यात आली होती. सर्व्हेमध्ये दिलेल्या प्रश्नावलीमध्ये नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, जात, रोजगार, घरातील सदस्यांची संख्या, नोकरी करणाऱ्या महिला, घुंघट प्रथा, बुरखा प्रथा याविषयी प्रश्न विचारले जात होते. पडगाच्या जवळील बोरीवली गावात ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सर्व्हे सुरु होता तो परिसर मुस्लिमबहुल परिसर आहे.

विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरु असताना कुणीतरी अफवा पसरवली की 'हे विद्यार्थी नसून एनआरसीवाले आले आहेत'.  यानंतर परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली. या लोकांनी पहिल्यांदा या विद्यार्थ्यांशी काही वेळ संवाद केला. त्यानंतर विद्यार्थ्यांवरच प्रश्नांची सरबत्ती केली. या सर्व्हेचा उद्देश काय आहे? हा सर्व्हे कोण करत आहे? अशा प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी देऊ शकले नाहीत. या फिल्ड प्रोजेक्ट दरम्यान शिक्षक सोबत नव्हते तसेच या विद्यार्थ्यांचे मोबाईल शिक्षकांच्या जवळ जमा केले जातात. यावेळी विद्यार्थी आपल्या शिक्षकांनाही बोलावू शकले नाहीत.

हे ही वाचा- BLOG | नागरिकत्व कायद्याला विरोध यासाठी होतोय...

विद्यार्थ्यांकडून उत्तरं न मिळाल्याने या लोकांनी काही विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे हे विद्यार्थी पळू लागले. या विद्यार्थ्यांना कॉलेजकडून मिळालेल्या टी शर्टवर  NSS लिहिलं होतं. गावात यावरून काही लोकांनी अफवा पसरवली की हे RSS वाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आपले टी शर्ट काढून तिथून पळ काढला.

या घटनेनंतर त्या महाविद्यालयांनी NSS कॅम्प रद्द केला आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तर कॉलेज प्रशासनाकडून या प्रकरणी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेला नाही. कॉलेजकडून या विद्यार्थ्यांना  NSS कॅम्पचे फोटो डिलीट करायला सांगितले आहेत. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता करू नये, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-  CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं