अमरावती : राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बच्चू कडू यांनी मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच दौऱ्यात अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. बच्चू कडू यांनी दर्यापूर तहसील कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दर्यापूर येथील दोन नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना राशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांनी आपल्यासह प्रहारच्या दोघा आमदारांचा पाठिंबा शिवसेनेला जाहीर केला होता. यानंतर त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं. अजून त्यांना कुठल्याही खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना राशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तालुक्यासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयात आज दुपारी तीनच्या सुमारास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचानक भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांची चांगलेच धाबे दणाणल. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तहसीलदार यांना तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले. या आढावा बैठकीमध्ये तहसील कार्यालयांतर्गत रखडलेल्या कामाची राज्यमंत्र्यांनी माहिती घेतली. या बैठकीदरम्यान संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभाग या दोन विषयावर तब्बल एक तास बैठक चालली. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभागात संदर्भात वारंवार चकरा मारूनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार संबंधित नागरिकांनी राज्यमंत्र्यांकडे करताच संजय गांधी निराधार योजनेतील निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि पुरवठा विभागातील प्रमोद काळे या  दोन्ही कामकचुराई करणाऱ्या अधिकारांवर त्वरित निलंबित करण्याचे आदेश तहसीलदार योगेश देशमुख यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. त्यांच्या या आदेशानंतर तहसीलदार यांनी यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली.
यापूर्वी ते आमदार असताना देखील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्यातील वादाचे किस्से गाजले आहेत. मंत्रालयात देखील कक्ष अधिकाऱ्याला कानाखाली वाजवल्याप्रकरणी ते अडचणीत देखील आले होते. तर तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याला तीन तास कार्यालयात कोंडलं होतं. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत रक्कम देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्याची सुटका केली होती.

तसेच त्यांना नाशिकमध्ये देखील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला होता. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांना घेराव घातला होता. त्यावेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला होता.

संबंधित बातम्या