नागपूर : शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषि विभाग सज्ज आहे. बोगस बियाणे, खते विक्री रोखण्यासाठी विभागीय व जिल्हास्तरावर 70 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच बियाणे व खतांच्या उपलब्धतेसंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी  दिली.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमात भोसले बोलत होते. माहिती संचालक हेमराज बागुल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, माध्यम समन्वय अधिकारी अनिल  गडेकर यावेळी उपस्थित  होते. नागपूर विभागात 19 लाख 58 हजार 566 हेक्टर क्षेत्रावर खरीप  पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कापूस, सोयाबीन, तूर, भात, इतर बियाणे व खते उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विभागात खरीप पिकाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करावी, असेही  कृषी सहसंचालकांनी यावेळी सांगितले.


कृषी विभागातर्फे खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या तयारीसंदर्भात माहिती देताना सहसंचालक भोसले म्हणाले की, विभागात सरासरी 51 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी  19 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने कापूस  6 लाख 20 हजार हेक्टर, सोयाबीन  3 लाख 2 हजार  650 हेक्टर, तूर 1 लाख 97 हजार हेक्टर, भात 8 लाख 30 हजार तर इतर पिकाखाली 8 हजार 716 हेक्टरचा समावेश आहे. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून त्यादृष्टीने बियाण्यांचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करावीत. तसेच बियाण्यांच्या पिशवीवरील प्रमाणपत्र न काढता खालच्या बाजूने बियाणे काढावे. काही बियाणे उगवणक्षमता तपासण्यासाठी शिल्लक ठेवावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.


सोयाबीन व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी  स्वत:कडील बियाण्यांचा वापर करावा. पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी. मागील तीन वर्षांतील खतांची मागणी लक्षात घेवून नियोजन करण्यात आले. यंदा 5 लाख 83 हजार मेट्रिक टन सरासरी मागणी असून प्रत्यक्ष 6 लाख 23 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे विभागात खतांची टंचाई होणार नाही व आवश्यकतेनुसार खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी भोसले यांनी  सांगितले. 


येथे करा तक्रार


अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीसंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित कृषी केंद्राचे परवाने रद्द तसेच दोन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशकाच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत विभाग, जिल्हा तसेच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. हे कक्ष सकाळी  10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी 9373821174 या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा  1800 233 4000 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे भोसले म्हणाले.



जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच सोयाबीन पेरणी करा


सोयाबीन हे संवेदनशील पीक असल्याने जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. उगवण क्षमता तपासूनच त्याप्रमाणात बियाण्याचा वापर करावा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. तसेच पेरणीसाठी टोकण पद्धती किंवा प्लँटर पद्धतीचा वापर करावा. पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत प्रत्येक कृषी सहायकाला सर्वेक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सल्ला प्रसारित करतील, अशी माहिती भोसले यांनी दिली.