Jalna Water Issues: औरंगाबादप्रमाणे आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादनंतर आता जालना शहरात 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. शहराचा रखडलेला विकास आणि पाणीपश्न यासह अन्य मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याची माहिती भाजप आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामन्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादप्रमाणेच जालना शहरात बुधवारी सकाळी दहा वाजता मामा चौक ते गांधी चमन येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार असून, यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे. तर केंद्र सरकारकडून रावसाहेब दानवे यांनी विशेष प्रयत्न करून मोठा निधी आणला. परंतु शहरातील पालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याने शहरवासियांची गैरसोय होत असल्याचा आरोप संतोष दानवे यांनी केला आहे.


काँग्रेसवर निशाणा...


उद्याच्या मोर्च्याविषयी बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना जालना नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तरीही रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला. यात अंतर्गत जलवाहिनीसाठी प्रमुख्याने 125 कोटी रुपये उपलब्ध करून दिले, तरी शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता शहरातील मामा चौक येथून या मोर्चाला सुरुवात तर गांधी चमन येथे या मोर्चाचा समारोप होईल,असे दानवे म्हणाले. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्च्यात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी म्हणून मोर्च्यास्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. सोबतच मोर्च्याच्या ठिकाणी साध्या वेशात सुद्धा विशेष पोलीस तैनात असणार आहे.