सावरकरांचा त्याग मोठा, त्यांचं स्वातंत्र्यसाठीचं योगदान विसरता येणार नाही : हुसेन दलवाई
आफताब शेखसह एबीपी माझा वेबटीम | 19 Jan 2020 06:13 PM (IST)
सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमान तुरुंगात पाठवा, असा काँग्रेसला इशारा देणाऱ्या राऊतांनी नंतर सारवासारव केली आहे. भाजप मनसेकडून शिवसेनेवर टीका होत असली तरी सत्तेत सहयोगी असलेलं काँग्रेस मात्र याबाबत सावध भूमिका घेत आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राऊत बोलण्याला लगाम घालतील असं म्हटलं आहे.
सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच देशासाठी त्याग मोठा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकर यांचं योगदान विशद केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. पण काही जण म्हणतात सावरकरांनी माफीचं पत्र लिहिलं होतं. पण मला यात वाद निर्माण करायचा नाही, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत अंदमानला जाऊन आले की नाही मला माहित नाही. राऊत बोलण्याला लगाम घालतील असं मी समजतो अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा असं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मुस्लिमांना सत्तेत स्थान दिलं जात नाही असा प्रश्न विचारला असता दलवाई म्हणाले की, महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक आहे. हे जे घडतंय ते चुकीचे आहे, महाराष्ट्रातला मुसलमान हा खऱ्या अर्थाने मातीतला मुसलमान आहे. इथला मुस्लिम हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याची भाषा कधीच करत नाही. कोणीतरी हैदराबादवरून शेरवानी घालून येतो आणि इथे गडबड करतो हे आम्हाला मान्य नाही. हे कुठे तर कुठे थांबवणं आवश्यक आहे, असा टोला त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांचे नाव न घेता लगावला. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यामध्ये फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला मदत केली. आणीबाणीला देखील बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता, असे दलवाई म्हणाले. यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही. देशाने फॅमिली प्लॅनिंग स्वीकारलं आहे. तीन वरून दोन वर आणलेलं आहे. भागवतांनी नुसत्या उठाठेव करू नये, असे ते म्हणाले. संबंधित बातम्या सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा; राऊतांच्या वक्तव्यानं शिवसेना अडचणीत? Vinod Tawade | भावाला मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत बिथरले, सावरकरांच्या विधानावर विनोद तावडेंचा स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असल्याने त्यांच्या विरुद्ध रान उठवलं जातंय : विक्रम गोखले माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं; सचिन सावंत यांची मागणी