मुंबई : मागील काही दिवसांपासून ऊर्जामंत्री नितीन राऊत विविध माध्यमांशी बोलताना महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांमधील एसईबीसी प्रवर्गातील मराठा समाजातील तरुणांवर अन्याय न होऊ देता त्यांना देखील घेतलं नोकरीत समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात जी ऊर्जा विभाकडून काढण्यात आलेली प्रेसनोट आहे, यामध्ये मात्र उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्ग सोडून जे इतर प्रवर्गातील तरुण आहेत त्यांना घेतलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून ऊर्जामंत्री नितीन राऊत मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत आहेत. सध्या राज्यभरातील मराठा समाजातील तरुणांचे आम्हाला फोन येत आहेत. जर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार ऊर्जा विभागात समाविष्ट करून घेतलं नाही तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असे मेसेजेस येत आहेत. जर ऊर्जामंत्री यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर राज्यभरातील मराठा समाजातील तरुण कोणत्या थराला जातील सांगता येणार नाही. आणि जर अशी काही परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला केवळ महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना राजन घाग म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सध्या भरती प्रक्रियेबाबत प्रचंड घोळ चालवला आहे. ज्यावेळी नितीन राऊत यांनी सांगितलं होतं की आम्ही एसइबीसी प्रवर्गातील मुलांवर अनन्या होऊ देणार नाही त्यावेळी आम्हाला बरं वाटलं होतं. परंतु त्यांनी जे पत्रक काढलं आहे त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मराठा समाजातील सध्या अनेक मुलांचे फोन आणि मेसेज येतं आहेत. आमचा विषय मार्गी लागला नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल अशा आशयाचे मला मुलांचे मेसेज येतं आहेत, असं घाग यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी आम्ही मशाल मार्च केला त्यादिवशी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांत भेट करून देण्यात येईल परंतु आजपर्यंत आमची भेट करून देण्यात आलेली नाही. आज दहा दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे आता वीज वितरण विभागाच्या विषयावरून जर मराठा समाजात नैराश्य पसरलं आणि त्यातून जर कोणी आत्महत्या केली तर त्याला सरकार जबाबदार असेल. या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊ आणि महावितरण विभागाच्या भरती प्रक्रियेबाबत स्पष्टता आणावी याबाबत त्यांना विनंती करू. सध्याचं सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे प्रचंड दुर्लक्ष करत आहे. आम्ही मागणी केली अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा तर यांनी मराठा समाजासाठी प्रचंड काम करणाऱ्या नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवलं. त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी मुंबईत मशाल मार्च प्रतिकात्मक काढला होता आता तो प्रत्येक जिल्ह्यातुन काढण्यात येणार आहे, असं घाग यांनी म्हटलं.