मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या 368 कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेले वर्षभर आपल्या नियुक्ती आदेशाची वाट बघणाऱ्या या 368 जणांना ऐन दिवाळीत गोड बातमी मिळणार आहे.
महावितरण कंपनीत गेल्या वर्षी भरती करण्याच्या दृष्टीने कनिष्ठ अभियंता या पदाकरता निवड परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी करून सुमारे 368 पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते.
आता या सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती व पदस्थापना देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांना आज दिले. या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक फिस्कटली; ऐन दिवाळीत काळोखाची भीती?
गेल्या वर्षी महावितरणने सरळ सेवा भरतीद्वारे 327 तर अंतर्गत भरतीद्वारे 41 कनिष्ठ अभियंत्यांची निवड केली होती. कोरोनामुळे या सर्व पात्र उमेदवारांना कागद पडताळणी होऊनही नियुक्ती आदेशाकरता वाट पहावी लागली. त्यातच महावितरणच्या बिल वसुलीवर कोरोनाचा मोठा प्रभाव पडल्याने कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.
साहजिकच या सर्वाचा प्रभाव नवीन नियुक्तीवर झाला होता. मात्र आता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नियुक्ती आदेश देण्याच्या सूचना दिल्या असल्याने या सर्व कनिष्ठ अभियंत्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच या सर्व अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारकडून गंभीर विचार; कर्मचारी संप करणार नाही : उर्जामंत्री