Child Marraige: कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे. या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 


युनिसेफच्या (unisef) माहितीनुसार, दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहाच्या संख्येच्या 45 टक्के इतकी आहे. त्यामुळे जगातील बालविवाह रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले होते ते अयशस्वी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. 


रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युनिसेफच्या प्रादेशिक संचालक नोआला स्किनर यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील वाढती बालविवाहाची समस्या ही अत्यंत निराशाजनक असून त्यावर योग्य ते नियंत्रण आणलं जावं अशी मागणी करण्यात येत आहे. 


अभ्यासात असे देखील समोर आले की, कोविड महामारीमुळे कुटुंबावर आर्थिक संकटे आली, त्यामुळे घरखर्च चालवणे देखील कठीण झाले. म्हणून अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देण्याकडे या कुटुंबांचा कल वाढला.


नेपाळमध्ये मुलींच्या लग्नाचे वय 20 वर्षे आहे, तर भारत आणि श्रीलंकेत 18 आणि अफगणिस्तान, पाकिस्तानात 16 वर्षे आहे. 


आर्थिक परिस्थिती ठरली बालविवाहाचे महत्त्वाचे कारण..


युनिसेफ संस्थेने यासंदर्भात सामान्य नागरिकांशी देखील चर्चा केली. यावर लोकांनी प्रतिक्रिया देत, गरिबीविरोधात सुरक्षा देणे, प्रत्येक मुलीच्या शिक्षणाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बालविवाह केलेल्या मुलींना सर्वात जास्त धोका हा प्रसुती दरम्यान असतो. याशिवाय या मुलींना घरगुती हिंसाचार देखील सहन करावा लागतो. 


प्यु रिसर्चच्या वृत्तानुसार, अमेरिकेसह 117 देशांत अजूनही बालविवाह केले जातात. प्यु रिसर्चने बालविवाह ही एक आतंरराष्ट्रीय समस्या आहे असे ठळकपणे नमूद केलं आहे.


सर्वात जास्त बालविवाह या देशांत होतात.. 


भारत


बालविवाहाची संख्या: 2,66,10,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 47 टक्के


लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 21 / मुलगी - 18


इथियोपिया 
बालविवाहाची संख्या: 19,74,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 41 टक्के


इथियोपियात अशी देखील प्रथा आहे की, चुलत भाऊ आपल्या बहिणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिच्याशी  लग्न करू शकतो. त्यामुळे पाच पैकी एका तरी मुलीचे 18 वयाच्या आतच लग्न केले जाते. 


लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18 / मुलगी 18


ब्राझील


बालविवाहाची संख्या:  29,28,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 36 टक्के


लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18 / मुलगी - 18 - पालकांच्या संमतीने - 16


नायजेरिया 


बालविवाहाची संख्या: 33,06,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 43 टक्के


लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18/ मुलगी - 18


बांग्लादेश


बालविवाहाची संख्या: 39,31,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 52 टक्के


लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 21 / मुलगी - 18


ही बातमी वाचा: