Royal Challengers Bangalore Player Security Breach IPL 2023 : विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीने पंजाबचा पराभव केला. मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने २४ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यावेळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.. विराट कोहली आणि आरसीबीच्या खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. मोहालीमध्ये आरसीबीचा संघ राहात असलेल्या हॉटेलमधून तीन हिस्ट्री शीटर्स (सराईत गुन्हेगार) ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही मोठी दुर्घटना घडली नाही. विराट कोहली आणि आरसीबी राहात असलेल्या हॉटेलमध्ये तीन सराईत गुन्हेगारही रूम रेंटवर घेऊन राहात होते.  


विराट कोहलीसह आरसीबीचे अनेक प्रसिद्ध खेळाडू आयटी पार्कमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते. त्यालेळी त्या हॉटेलमध्ये तीन सराईत गुन्हेगारही आल्याचे समजले. त्यानंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली. पोलीस अधिका-यांना सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानंतर  रात्री साडेदहाच्या सुमारास हिस्ट्रीशीट करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईत अटक करण्यात पोलिसांना यश आले.  रोहित (३३, रा. रॉयल इस्टेट, जिरकपूर), मोहित भारद्वाज (३३, रा. बापुधाम कॉलनी, चंदीगड), नवीन, झज्जर जिल्ह्यातील बहादूरगडचा रहिवासी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींवर गोळीबार आणि इतर गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच हे तिघेही किती गंभीर गुन्हेगार आहेत, याचा अंदाज यावरून येऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडे अवैध शस्त्रे असण्याची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींच्या खोल्यांसह संपूर्ण हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान पोलिसांनी आरोपींसोबत असलेली ब्रेझा कारची झडती घेतली. त्यानंतर कारसह काही साहित्य जप्त केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट संघ हॉटेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर थांबला होता. पाचव्या मजल्यावर विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंच्या खोल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी आरोपींना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर बुक केलेल्या खोलीतून अटक केली. पोलीस तिन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.