Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : जून महिना संपत आला असतानाही लपून बसलेल्या पावसाने आता शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली आहे. तर काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्याचे चित्र आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात शनिवारी किरकोळ स्वरूपात तर ग्रामीण मध्यम स्वरूपात पाऊस झाला. तर आज देखील अनेक भागात पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरीही शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची आस लागली आहे.
शनिवारी दिवसभर उकाडा होता, दुपारपासूनच पाऊस येणार असल्याची चिन्हे दिसत होती, संध्याकाळ होताच शहरावर ढग दाटून आले. मोठा पाऊस होणार असे वाटत असताना संध्याकाळी शहरावर पावसाचा शिडकावा झाला. शहर परिसरामध्ये काही भागांमध्ये दमदार पाऊस झाला. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत होता. दरवर्षी या वेळेस पेरण्यांची लगबग असते, मात्र यंदा केवळ पावसाच्या प्रतीक्षेतच जून महिना निघून जातो की काय, ही चिंता बळीराजाला होती. मात्र शनिवारी पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस लागली आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काल चांगला पाऊस झाल्याने आज पेरण्यांना सुरवात झाल्याचे चित्र दिसून आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 लाख 75 हजार हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र असून शेतकरी सर्व जिल्ह्यांत पेरणीयोग्य पाऊस होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, शनिवारी पैठण तालुक्यातील पाचोड भागामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर तब्बल दीड तास दमदार पावसाने हजेरी लावली, दुपारपासूनच ढग दाटून येत पावसाचे वातावरण तयार झाले होते. पाचोडसोबतच बिडकीन परिसरातही पावसाच्या दमदार आगमनामुळे आता पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे.
आज देखील अनेक भागात पाऊस...
दरम्यान आज दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात पैठण तालुक्यातील इसारवाडी, पाचोड मध्ये पावसाने हजेरी लावली. तर वाळूज औद्योगिक परिसरात देखील आज पावसाने हजेरी लावली. तर इतर भागात देखील कमी-अधिक पावसाने हजेरी लावली आहे.
नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
गत महिनाभरापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या संभाजीनगरकरांना दिलासा मिळाला. शनिवारी शहरात तुरळक पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी सध्याकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने पाचोड भागात दिड तास दमदार हजेरी लावली, तर बिडकीनमध्ये देखील दीड-दोन तास पाऊस सुरू होता. त्यामुळे पहिल्याच पावसाने वातावरणात काहीसा गारवा दाटला. नागरीकांना उकाड्यापासून उसंत मिळाली आल्हाददायी वातावरण शनिवारी राञभर राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या: