Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु आहेत. मात्र, यावर अजूनही दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिकिया आलेली नाही. अशात राज्याच्या राजकीय घडामोडी पाहता या दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी भावना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची आहे. त्यातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान 'एबीपी माझा'शी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, "गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. राज्यातील जनतेला हे सर्व काही आवडलेलं नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. मात्र, हे फक्त उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांना नेतृत्व देऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत."
भाजपचा दुटप्पीपणा आम्ही उघड करणार...
तर सर्व वाद नेतृत्वावरुन असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले की, "या अत्यंत किरकोळ गोष्टी आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा लोकप्रिय, कार्यक्षम नेता मिळणंच अवघड आहे. मला भाजपचे नवल वाटते की, ते राज ठाकरे यांच्यासोबत वैयक्तिक मैत्री ठेवतात. पण त्यांना राजकीय सोयर म्हणून भ्रष्टाचारी राष्ट्रवादी चालते. त्यांच्या कित्येक लोकांचं हिंदू लोकांबद्दल काय मत आहे. तरीही त्यांना ते चालतात आणि राज ठाकरे चालत नाहीत. त्यामुळे भाजपचा हा दुटप्पीपणा आम्ही उघड करु."
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामानिमित्त या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चर्चेत काही राजकीय चर्चा देखील होणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: