Aurangabad ACB Trap : नाशिकमधील (Nashik) तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पडकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता औरंगाबादच्या (Aurangabad) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील अशीच मोठी कारवाई केली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार पदावर कार्यरत असलेल्या पवन परिहार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. तर त्याच्यावर सिडको पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण? 


पवन परिहार हा औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक नगर रचनाकार पदावर कार्यरत आहे. दरम्यान, तक्रारदार समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात. या कंपनीच्या संचालकांनी चिकलठाणा परिसरातील गट क्र. 377 मधील 17 हजार 100 स्क्वेअर मीटर जागेचे विकास करारनाम्याचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. विशेष म्हणजे हा अर्ज परिहारकडे आला. कारण, रचनाकार परिहारकडे याची मुख्यत्वे जबाबदारी होती. मात्र, पवन परिहार हा तक्रारदारांना कार्यालयात चकरा मारायला लावून दालनाच्या बाहेर उभे करत होता. त्यानंतर त्याने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. तसेच तक्रारदाराला रोज चकरा मारायला लावल्या. तक्रारदारासोबत कंपनीचे बडे संचालक, भागीदार देखील गेले. मात्र, पैशांसाठी त्याने त्यांनाही तासनतास दालनाबाहेर उभे केले. शेवटी तडजोडीअंती त्याने दीड लाख रुपये मागितले. तक्रारदाराने याची एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने याची खात्री केली असता त्याने तीन वेळा पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. 


कारवाईची कुणकुण लागताच मेडिकल रजा टाकून पसार


तक्रारदार यांचा अर्ज मार्गी लावण्यासाठी परिहार याने तीन लाख रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती दीड लाखाचा सौदा ठरला. मात्र, कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने लाचेची खात्री केली असता परिहार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने सापळा रचला. मात्र, तक्रारदारावर संशय आल्याने परिहारने ऐनवेळी पैसे स्वीकारणे टाळले. तसेच आठ दिवसांपूर्वी त्याला कारवाईची शक्यता जाणवताच मेडिकल रजा टाकून पसार झाला. त्यामुळे लाच मागिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एसीबीच्या पथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई