Jayakwadi Dam : जायकवाडी धरणावर 15 हजार एकरात सौर ऊर्जा प्रकल्प होणार असून, याच जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मासेमारी करणारे 25 हजारच्यावर कुटुंब मासेमारी करतात. त्यामुळे हा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज हजारो मासेमारी करणारे नागरिक पैठण तहसील कार्यालयवर धडकले. दरम्यान यावेळी हातात मासे घेऊन धरण नाही कोणाच्या बापाचे धरण आमच्या हक्काचे आशा घोषणाबाजी करण्यात आली. तर, पाण्यावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रेडिएशन तयार होऊन आसपासच्या परिसरातील लोकांना शंभर टक्के कॅन्सरचा धोका निर्माण होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाण्यात त्याचे रेडिएशन होऊन नैसर्गिक मत्स्य उत्पत्ती होणार नाही. त्यामुळे मत्स्यबीज उत्पत्ती न झाल्यास जलाशयातील मत्स्य संपूर्ण संपुष्टात येईल, असा दावा आंदोलकांनी केला आहे.
तर, केंद्र शासन व राज्य शासन हे जायकवाडी धरणाच्या जल फुगवटा क्षेत्रामध्ये तरंगते सौर प्रकल्प बसवण्याच्या चाचपणीसाठी धरणातील 15 हजार एकरावर सर्वे करण्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या अधिपत्याखाली व जीओ सर्व्हिसेस मॅरीटाइम प्रा. लि. या एजन्सीमार्फत जो सर्व्हे चालु आहे. तो सर्व्हे तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तर, जायकवाडी जलाशयात चिलापी जातीच्या माश्यांची पैदास वाढलेली आहे. हा चिलापी जातीचा मासा वर्षातून 4 वेळेस पिल्ले देत असून, आज रोजी या जलाशयात अब्जावधी चिलापी मासे आहेत. जर या चिलापी माश्यांची मासेमारी थांबली तर चिलापी माश्यांचे नैसर्गिक उत्पन्न वाढून संपूर्ण जलाशयात केवळ चिलापी मासेच शिल्लक राहतील. ज्यामुळे या जलाशयाचे नैसर्गिक संतुलन खराब होवून संपूर्ण पाणी दुषित होवून पिण्या योग्य व सिंचना योग्य राहणार नाही. चिलापी मासा हा पक्षी अभयारण्यातील पक्षांना देखील धोकादायक आहे. कारण हे चिलापी मासे पक्षांचे खाद्यच खात असल्याने पक्षांचे नैसर्गिक वाढीस त्यामुळे फार मोठी हाणी पोहचेल. जर जलाशयातील चिलापी मासेमारी ही थांबल्यास त्यामुळे निसर्गास फार मोठा धोका निर्माण होईल. याचा अभ्यास करणे शासनास अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या...
- विदेशी व देशी पक्षी पाण्यात मुक्त संचार करतात जर तरंगते सौर पॅनल पाण्यात बसविल्यास त्यांना नैसर्गिक अधिवास राहणार नाही. त्यामुळे त्यांचेही नैसर्गिक संतुलन खराब होवुन पक्षांना सुध्दा त्याची फार मोठी हानी पोहचणार आहे.
- जायकवाडी जलाशया हा 36 हजार हेक्टर जलसाठा असून प्रतिवर्षी 70% पाणी साठा कमी होऊन जुन अखेर फक्त 30% म्हणजे मृत साठा शिल्लक राहतो आणि त्यावर जर सौरऊर्जा प्रकल्प राबवल्यास संपूर्ण पाणी झाकून जाईल आणि त्यामुळे पाण्याची गटारगंगा होईल आणि परिसरात प्रचंड प्रमाणात रोगराई निर्माण होईल.
- पारंपरिक मच्छिमारांचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. मासेमारीवरच मच्छिमारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. 80% मच्छिमार हा भुमिहिन असल्याने मासेमारी हेच उपजिविकतेचे साधन असल्याने प्रत्यक्षात 20 ते 25 हजार मच्छिमार कुटूंबे मासेमारी करत असुन त्यावर ते सव्वा लाख लोकांचे जीवनमान अवलंबून आहे.
- पाण्यावर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्प जेथे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांची उपजिविका चालते आशा कोणत्याही ठिकाणी असा प्रकल्प राबविण्यात येऊ नये. तो जेथे शाश्वत पाणीसाठा आहे म्हणजे असे प्रकल्प समुद्रात किंवा जिरायत भागात जेथे शेती पिकवली जात नाही आशा ठिकाणी प्रकल्प राबविण्यात यावेत.
- जायकवाडी जलाशया हा पक्षी अभयारण्य म्हणून राखीव केलेला जलाशय आहे आणि त्यावर हजारो पक्षांची ही छोटी मत्स्य खाद्य असून, मच्छिमारांना पकडण्यास बंधन असुन मच्छिमारांकडुन त्याचे काटेकोरपण दखल घेतली जाते. हा प्रकल्प राबवल्यास पशुपक्षांचे अन्न नष्ट होऊन जाईल व पर्यावरणास ही धोकादायक असल्याने याची गंभीर दखल घेण्यात यावी. तरी वरील मागण्या मान्य करून सौर प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा. नसता भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या: