छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने 1 रुपयात पीक विमा (Crop Insurance)  देण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचाच गैरफायदा घेत एका पठ्ठ्याने स्वतःची तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात 11 हजार एकर जमीन असल्याचे दाखवत 23 जिल्ह्यांमध्ये 200 ठिकाणी पीक विमा भरला आहे. विशेष म्हणजे केवळ 200 रुपयांच्या विमा रकमेत त्याला तब्बल 14 कोटी पेक्षा अधिक विम्याची रक्कम मिळणार होती.  पीक कृषी विभागाने केलेल्या चौकशीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. मात्र, या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सरकार आणि विमा कंपनीला 14 कोटींचा चुना लावणारा तरुण एका छोट्याश्या खेड्या गावात असलेल्या आपलं सरकार केंद्रात कामाला आहे. 


राज्यात एक असा शेतकरी आहे ज्याच्याकडे 23 जिल्ह्यात तब्बल साडेचार हजार हेक्टर, म्हणजेच 11 हजार एकर जमीन आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण जमिनीवर सोयाबीन लावण्यात आले आहे. तुम्हाला विश्वास बसत नसला तरीही कृषी विभागाने खरीप पीकविमा योजनेत केलेल्या शेतकऱ्यांच्या पडताळणीत अशा एका पठ्ठ्याची ओळख समोर आली आहे. बर खरी गंमत पुढे आहे, कारण नुकसान भरपाईसाठी हा पठ्ठा जर पात्र ठरला असता, तर त्याला अवघ्या 200 रुपयांत तब्बल 14 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा लाभ मिळणार होता. बर, यात 1 रुपयात विम्याची घोषणा करणाऱ्या सरकारला 14 कोटींचा चुना लागणार होता...


कसा झाला घोटाळा... 



  • या पठ्ठ्याने 23 जिल्ह्यांमध्ये जमीन असल्याचे दाखवत विम्यासाठी 200अर्ज केले.

  • संभाजीनगर जिल्ह्यात 50 अर्जामधून 1 हजार 221 हेक्टर जमीन दाखवून 6 कोटी 9 लाख 65 हजार 875 रुपयांचा विमा काढला.

  • बीड जिल्ह्यात 31 अर्जामधून 583 हेक्टर जमीन दाखवून 3 कोटी 4 लाख 235 हजारांचा विमा उतरवला.

  • हिंगोलीत 14 अर्जाद्वारे 490 हेक्टर जमीन दाखवली 

  • लातूरमध्ये 14 अर्जातून 380  हेक्टर जमीन दाखवली.

  • सोबतच चंद्रपूर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील विमा उतरवला

  • या जमिनीचे क्षेत्र अजून विमा कंपनीकडून उपलब्ध झालेले नाही.

  • एकूण आकडा 5 हजार हेक्टरच्या वर जाईल.


सरकार आणि कंपनीचे असे होणार होते नुकसान... 



  • साडेचार हजार हेक्टर जमिनीवर सोयाबीनचे पीक दाखवून 22 कोटी 57 लाख 43  हजार 178 रुपयांचा विमा काढला.

  • राज्य सरकारला शेतकरी हिश्श्यापोटी सुमारे 3 कोटी 98 लाख 65  हजार 854 रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागणार होते.

  • यातून राज्य सरकारला चार कोटींना गंडवले असते.

  • नुकसानभरपाईचे निकष लागू झाल्यास 50 टक्के भरपाईपोटी 14 कोटी रुपयांचा लाभ मिळाला असता.


अन्य जिल्ह्यातही बोगस पीक विमा भरण्यात आल्याची शक्यता


सरकार आणि विमा कंपन्यांना चुना लावणारा हा पठ्ठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे. या तरुणाने 22 कोटी 57 लाखाचा विमा काढला आहे. आता प्रश्न असा पडतो की एका छोट्याश्या खेड्या गावात बसून एक तरुण एवढा मोठा पराक्रम कसं करू शकतो. विशेष म्हणजे, केवळ बीड आणि छत्रपती संभाजीनगर नाही तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही अशाच प्रकारचे बोगस पीक विमा भरण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, यातून सरकार आणि विमा कंपन्या धडा घेऊन आपल्या त्रुटी सुधारतील का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीड जिल्ह्यात आणखी एक पीक विमा घोटाळा, साखर कारखान्याच्या अकृषी जमिनीवर काढला विमा