छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीनं (MVA) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) 8 आणि काँग्रेसच्या (Congress) 13 अशा एकूण 30 जागांवर मविआनं विजय मिळवला. महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणूक देखील संयुक्तपणे लढवणार असल्याचं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातील काही गोष्टी समोर येत आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्याबद्दलची तक्रार काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे केली आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या या पत्रानंतर महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्रात नेमकं काय?
के.सी. वेणूगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंगोली मतदारसंघातील प्रज्ञा सातव यांच्या भूमिकेबद्दल आणि कृतीबद्दल तक्रार केली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रज्ञा सातव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेच्या विरोधात काम केल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे, असंही नागेश पाटील आष्टीकर म्हणाले.
प्रज्ञा सातव यांनी पक्षाच्या सूचनांचा विरोध करत वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप देखील नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीत त्या एकाही प्रचार मोहिमेत त्या एकाही सभेत सहभागी झाल्या नाहीत, असं देखील नागेश पाटील आष्टीकर म्हणाले.
नागेश पाटील आष्टीकर यांनी के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची प्रज्ञा सातव यांच्या निवडणुकीच्या काळातील भूमिकेची चौकशी करुन राज्यात इंडिया आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी योग्य शिस्तपालनासंदर्भातील कारवाई करा, अशी विनंती नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे.
मविआत नव्या वादाला तोंड फुटणार ?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे. या प्रकाराची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही आष्टीकर यांची आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेल्या या आरोपाने महाविकास आघाडीत आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुराव कदम यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या :
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'