Sambhaji Bhide in Aurangabad : मागील काही दिवसांत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. तर जागोजागी त्यांच्या कार्यक्रमांना विरोध होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, उद्या (1 ऑगस्ट) रोजी संभाजी भिडे यांचा औरंगाबाद (Aurangabad) शहरात कार्यक्रम होणार असून, यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत औरंगाबाद शहर पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. 


औरंगाबाद शहरात उद्या पाच वाजता कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांना पोलिसांनी लेखी पत्र देऊन परवानगी नाकारली आहे.  काँग्रेससह इतर संघटनांनी उद्या होणारा भिडे गुरुजींचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र पोलिसांनी आयोजकांना पाठवले आहे. 


महाविकास आघाडीकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा... 


आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या चर्चेत असलेले भिडे गुरुजी हे उद्या औरंगाबाद शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेत घेत, निवेदन देत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नयेत अशी मागणी केली आहे. जर भिडे गुरुजींच्या उद्याच्या शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिली तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने तो कार्यक्रम हाणून पाडतील असा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच जर उद्या भिडे गुरुजी शहरात आलेच, तर ते परत कसे जातील हे बघूच असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.


राज्यभरात संतापाचे वातावरण... 


मागील काही दिवसांत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य सतत समोर येत आहे. तर भिडे यांनी महापुरुषांबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यभरात भिडे यांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sangli News : काँग्रेस, पुरोगामी पक्ष, संघटनांकडून संभाजी भिडेंचा निषेध; भाजप खासदारानेही कुणीही समर्थन करणार नाही म्हणत सोडले टीकास्त्र