Marathwada Rain Update : एकीकडे राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मराठवाड्यात (Marathwada) आज मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या मराठवाड्याला आज बाप्पा पावणार आहे. नवी दिल्ली भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ज्यात 27 ते 30 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन पाहायला मिळाले आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच आठही जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात उशिरा पाऊस आला आणि ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला होता. सप्टेंबर महिन्याचे देखील 20 दिवस कोरडे गेले. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडले होते. अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः करपून गेली होती. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पण असे असलं तरीही अजूनही अनेक जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही.
विहिरींच्या पाण्यात वाढ...
मागील उन्हाळ्यात विहिरींच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली होती. त्यामुळे जुना महिन्याच्या सुरवातीला अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या होत्या. सोबतच बोअरवेल देखील आटले होते. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावात तर टँकरने पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनली होती. अशातच मागील चार-पाच दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जमिनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, विहिरींमध्ये सुद्धा पाणी आले आहे.
हिंगोलीत पाणीच पाणी...
गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात पाणीच पाणी पाहायला मिळाले. वसमत तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यात बोरी सावंत, हापसापुर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांना पावसाचा फटका बसला आहे. तर, शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: