Marathwada Water Shortage : पावसाने पाठ फिरवल्याने विहीर आटल्या, पिके करपली, मराठवाड्यातील (Marathwada) काही गावात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची (Tanker) वाट पहावी लागते आहे. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात टँकरची संख्या गेल्या महिन्यापेक्षा दीडपटीने वाढली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील अंतरवली गावात तर आज अशी परिस्थिती आहे की, पाणी नसल्याने अर्धे लोकं अंघोळच करत नाही. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत कोणत्या उपयोजना राबवल्या जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ओळख असलेलं जायकवाडी धरण ज्या पैठण तालुक्यात आहे, तेथील पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. कारण याच पैठण तालुक्यातील अंतरवली गावातील नागरिकांना भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अंदाजे 300 लोकांची वस्ती असलेल्या या अंतरवलीत 2 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे दिवस निघाला की, पाण्याचं टँकर कधी येणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले असतात. एवढच काय तर पाण्याची बचत व्हावी म्हणून गावातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी रोज अंघोळ करणे सोडून दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे ज्या अंतरवली गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, ते गाव औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील आहे. विशेष म्हणजे याच पैठण तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 178 गावांची निवड करण्यात आली असून, याचे वर्कआर्डर ऑक्टोबर 2022 मध्ये निघाला आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 4 टक्के काम झाले असल्याचे सांगत खासदार जलील यांनी पोलखोल केली होती.
शहरात देखील पाणी प्रश्न गंभीर...
विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच्या ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कारण महानगरपालिका हद्दीत आजही आठ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना देखील अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर अनेकजणांना खाजगी टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली आहे.
विभागात 84 टँकरने पाणीपुरवठा
पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात आज घडीला एकूण 84 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 30 गावं आणि 4 वाड्यांवर एकूण 41 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर 43 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर, चारशेहून अधिक विहिरी देखील पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते.
पुन्हा टँकरवाड्याच्या दिशेन प्रवास...
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्याची ओळख 'टँकरवाडा' अशी झाली होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्याची असलेली टँकरवाडा ही ओळख पुसली होती. पण, आता ऐन पावसाळ्यात पुन्हा टँकरची संख्या वाढत चालल्याने मराठवाड्याचा प्रवास पुन्हा टँकरवाड्याच्या दिशेने सुरू झालाय. त्यामुळे विभागातील सातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाच्या देखील नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :