औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आज आढावा घेणारी बैठक बोलवण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. तर यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


कृषिमंत्री मुंडे यांनी बोलावलेल्या या बैठकीत बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे. 


मराठवाड्यात पाणी टंचाई...


ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने मराठवाड्यात आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अशा गावात प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक महत्वाच्या प्रकल्पात देखील अल्प पाण्याचा साठा असल्याने चिंता वाढली आहे. तर काही प्रकल्प अक्षरशः कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत विभागात पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीच गंभीर होऊ शकते. तसेच मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रशासन आणि सरकारकडून दखल घेण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या उपयोजना देखील करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कृषिमंत्री मुंडे यांनी आज औरंगाबादमध्ये मराठवाडा विभागाची आढावा बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत आज कोणते-कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


बैठकीत यांची असणार उपस्थिती...


या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, यांसह अन्य मंत्री महोदय, तसेच विभागीय आयुक्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांसह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहतील.


इतर महत्वाच्या बातम्या: 


पावसाची दडी! पिकं वाचवण्यासाठी तांब्याने पाणी घालण्याची वेळ, थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड