औरंगाबाद : शहरात उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र, मराठवाड्यात आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोडीत काढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, आतापर्यंत झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी या सरकारी विश्रामगृहातच पाहायला मिळाला आहे .पण, मुख्यंमत्री शिंदे हे 16 सप्टेंबरला फोर स्टार हॉटेलात तब्बल 32 हजार रुपये किराया असलेल्या आलिशान सूटमध्ये राहणार आहे. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तत्कालीन मुख्यंमत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विश्रामगृहातच राहण्याची परंपरा निर्माण केली होती. पण यंदा चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे.


मंत्रिमंडळ बैठकीचा थाट कसा असणार तेही पाहूया...



  • रामा  हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)

  • ताज हॉटेल 40  रूम बुक (सर्व सचिव)

  • अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

  • अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक  (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)

  • महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

  • पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)

  • वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे - 20 ( इतर अधिकारी)

  • एकूण 150 गाड्या नाशिक येथून हायर करण्यात आल्या आहेत.

  • औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या हायर करण्यात आल्या आहेत.

  • मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे. 


सहा जिल्ह्यातून बोलावला पोलीस बंदोबस्त...


राज्य मंत्रिमंडळाची 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद मध्ये बैठक होणार असल्याने, प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच मंत्री शहरात असणार आहे. सोबत वरिष्ठ अधिकारी देखील असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी वेगवेगळ्या सहा जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त देखील मागवण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद शहर पोलिसांचा देखील बंदोबस असणार आहे. त्यामुळे आज पासून शहरात रस्त्यावर पोलीससच पोलीस पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने काही मार्गात बदल देखील करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी घराबाहेर पडतांना एकदा वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलची माहिती घेऊनच बाहेर पडले पाहिजे.अन्यथा तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक! 73 आंदोलने अन् 18 आत्मदहनाचे इशारे; पोलिसांनी मागवल्या 8 हजार अश्रुधुराच्या कांड्या