Aaditya Thackeray : पावसाअभावी मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. यामध्ये ते छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली आहे. विशेष औरंगाबाद दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या (16 सफ्टेंबर) ते नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.


राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain)दडी मारल्यानं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं पाण्याअभावी वाया जात आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत असून, चांगल्या पावसाची वाट बघत आहे. पावसाअभावी नदी नाले कोरडे पडले आहेत. विहीर, बोअरवेल यांची पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीर आदित्य ठाकरे आज आणि उद्या दुष्काळजन्य स्थितीचा पाहणी दौरा करणार आहेत.


कसा असणार आदित्य ठाकरेंचा दौरा!


पहिला दिवस ( 15 सप्टेंबर)


औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सकाळी 11.30 वाजता पाहणी दौरा


पैठण तालुक्यातील लोहगांव येथे दुपारी 12.45 वाजता पाहणी दौरा


गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा येथे दुपारी 1.30 वाजता पाहणी दौरा 


वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसमवेत दुपारी 2.30  वाजता संवाद साधणार.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपात पाऊस झालेला असला तरीही मध्यंतरी एक महिना पावसाने पाठ फिरवली होती. या काळामध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतू, शासनाने या नुकसानीची अग्रीम भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरीही मदत पोहोचलेली नाही. हीच सद्य परिस्थिती समजून घेण्यासाठी आदित्य ठाकरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 


असा असेल नाशिक दौरा


दुसरा दिवस (16 सप्टेंबर)


नाशिकच्या निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील नुकसानग्रस्त भागाची 11.30 वाजता पाहणी 


सिन्नर तालुक्यातील वंडागळी 12.30 वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी


इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकरी संवाद