Chhatrapati Sambhaji Nagar News : लोकसभा निवडणुकीत उमेदवार (Lok Sabha Election Candidate) देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत (Maratha Community Meeting) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) मारहाणीचा प्रकार समोर आला होता. उमेदवारीवरून मत मांडणाऱ्या विकिराज राजेंद्र भोकरे यांना 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर शहरातील सिडको पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे. बाळू औताडे, अशोक मोरे, अक्षय शिंदे, रेखा वाटुळे, रवींद्र वाटुळे, सागर जाधव, सुनील यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष मराठा उमेदवार उतरवण्यासाठी बैठका होत आहे. दरम्यान, शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहरात देखील अशीच बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीत चर्चा सुरु असतानाच वाद सुरु झाला आणि पाहता पाहता थेट मारहाणीचा प्रकार घडला. उमेदवारीवरून आपलं मत मांडणाऱ्या विकिराज राजेंद्र भोकरे यांना 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. दरम्यान, आता हे प्रकरण थेट पोलिसांत पोहचले असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप...
बैठकीत झालेला वाद सायंकाळपर्यंत मिटवून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू होता. मराठा समाजातील महत्वाच्या व्यक्तींनी हस्तक्षेप करत दोघांना समजूत देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केल्याची माहिती आहे. मात्र, विकिराज हे तक्रार देण्यावर ठाम असल्याने मध्यस्थी अपयशी ठरली. शेवटी विकिराज यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मराठा समाजात आपण गरीब शिक्षित तरुण असून, लोकसभेत उमेदवारीत संधी मिळाली पाहिजे असे मत मी मांडले होते. असे बोलल्यानेच मला मारहाण करण्यात आली असून, हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विकिराज यांच्या तक्रारीनंतर भादंवि कलम 143, 147, 149, 323, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
विनोद पाटील लोकसभेसाठी इच्छुक....
एकीकडे लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत राडा झाला असतानाच, दुसरीकडे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विनोद पाटील महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!