छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, त्यांने कितीही गुन्हे दाखल केले तरी बेहत्तर असंही जरांगे म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, "संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातंय. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचं काम आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलनं करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायचं असं झालं तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील."
धनंजय मुंडेंचे पाय अजून खोलात
सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केलेत, षडयंत्र आखलेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. लोकांना सांगितलं जातंय की रास्ता रोखो करा, आंदोलन करा. पण यामुळे ते जास्त खोलात जात आहेत हे त्यांना समजत नाही.
गुंडांवर बोलायचं नाही का?
धनंजय मुंडे हे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे आहेत. धनंजय देशमुखांना जर कुणी धमकी देत असेल तर त्याला सोडणार नाही असं मी परभणीमध्ये म्हणालो होतो. गुंडांना बोलायचं नाही का?
आम्ही कुणाच्या जातीला धमकी दिली नाही. पण नेत्याला आम्ही सोडणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतला जात आहे. खून करणार तुम्ही, पाप करणार तुम्ही, आणि ओबीसींच्या मागे उभे लपायचं. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्यात. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली.
संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात हजार केसेस जरी दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही. धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही. त्याचवेळी अॅस्ट्रॉसिटी दाखल करून घेतलं असतं तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती.