Chhatrapati Sambhaji Nagar News : प्रत्येक वार्ड अधिकारी यांनी कचरा वर्गीकरणावर लक्ष द्यावे, अन्यथा ज्या झोनकडून वर्गीकरण केलेला कचरा प्राप्त होत नाही अशा झोनच्या वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचे पगार थांबवले जाणार असल्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहे. आज (03 जुलै) रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली. यावेळी बोलताना आयुक्तांनी हा इशारा दिला आहे.
यावेळी बोलतांना आयुक्त म्हणाले की, ज्या झोनमधून अशा वसाहती जिथे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देत नाही अशा नागरिकांचे प्रबोधन वॉर्ड अधिकारी यांनी करावे. वार्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांनी दररोज कमीत कमी घरांना भेट देऊन ओला आणि सुका कचरा वेगळा देण्याबाबत नागरिकांचे समुपदेशन करावे. मी स्वतः देखील लोकांमध्ये जाऊन याबाबत समुपदेशन करणार आहे. तर प्रत्येक वार्ड अधिकारी यांनी कचरा वर्गीकरणावर लक्ष द्यावे. ज्या झोनकडून वर्गीकरण केलेला कचरा प्राप्त होत नाही अशा झोनच्या वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचे पगार थांबवले जाणार असल्याचा इशारा देखील आयुक्तांनी बैठकीत दिला.
अतिक्रमण सर्वेक्षण करण्याच्या सूचना
याशिवाय शहरातील नाल्यांच्या काठावर अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून एका आठवड्यात अहवाल सादर करावे. तसेच सिडको भागात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण बाबत देखील एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. तसेच इमारत निरीक्षक यांना सहाय्यक पद निर्देशित अधिकारी करावे आणि प्रत्येक झोनमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात यावी. तर महापालिकेतील विविध विभागात अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
विकास योजनेचा पीएलयु दोन महिन्यात सादर करा
शहराची विकास योजनेत आरक्षण टाकताना खेळाचे मैदान, उद्यान, पार्किंग, एसटीपी प्लांट, कचरा प्रोसेसिंग प्लांट, हॉकर्स झोन आणि रुंद रस्ते या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी त्यांनी शहराचे डीपी प्लॅनच्या कामाचा आढावा घेतला. सोबतच या बैठकीत आयुक्तांनी ईएलयु (एक्झिस्टिंग लँड युज) नकाशा बघितला आणि सखोल आढावा घेतला. भविष्यात शासकीय गृह प्रकल्पासाठी देखील जागा आरक्षित करण्याचे निर्देश देखील दिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस, 7 वर्षांची चिमुकली वाहून गेली