Ambadas Danve On Imtiyaz Jaleel: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याकडून साखळी आंदोलन केले जात आहे. दरम्यान यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. मुस्लीम मतदार आपल्यापासून दूर जातील यामुळेच इम्तियाज जलील आणि एमआयएमकडून नाटक सुरु असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. 


दरम्यान याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील हे खासदार आहेत. तर ज्या पद्धतीने जलील यांनी उपोषण सुरू केलं आहे, ते लाक्षणिक उपोषण आहे. तिथे बिर्याणीच्या पार्ट्या होत आहे. हे सर्व नाटक असून, मुस्लीम तरुणांना मूळ प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी नाटक सुरु आहे. मुस्लीम मतदार आपल्यापासून दूर जातील यामुळेच इम्तियाज जलील आणि एमआयएमकडून नाटक सुरु असल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे. तर औरंगजेबाचा उल्लेख दानवे यांनी औरंग्या असा केला. तसेच औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा मांडला गेलाय, त्यात सगळ्यात आधी औरंगजेबाचे विचार निर्मूलन केलं पाहिजे. त्यानंतर पुढच्या गोष्टी आपोआप होतील असेही दानवे म्हणाले. 


कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर टीका 


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावरूनच दानवे यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ सिल्लोडच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. कापसाला आणि कांद्याला दर मिळत नसल्याने आत्महत्या होत आहे. तर प्रत्यक्षात कृषीमंत्री ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघात आत्महत्या होतात. त्यामुळे सरकारचे डोळे कधी उघडणार आहेत. या सरकारला किती शेतकऱ्यांचा जीव घ्यायचा आहे. तर शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. तसेच  सरकारने शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ठिकाणावर आलं पाहिजे, असे दानवे म्हणाले आहे. 


धीरज देशमुखांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया 


गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर अजून तोडगा निघेलेला नाही. असे असताना आमदार धीरज देशमुख बेळगावच्या एका कार्यक्रमात जाऊन जय बेळगाव जय कर्नाटक असे वक्तव्य केले आहे. दरम्यान यावरच बोलताना दानवे म्हणाले की, सीमा भागातील मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत. अशा भावना असताना धीरज देशमुख यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर जय बेळगाव जय कर्नाटक म्हटले हे मला माहित नाही. पण अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar: इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर; पुतळा जाळण्याचा प्रयत्न