Chhatrapati Sambhaji Nagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील सातारा पोलीस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटूंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे यात एका पाच वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.तर तिघांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30 वर्षे) पूजा मोहन डांगर (वय 25 वर्षे) आणि श्रेया डांगर (वय 5 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तिघांचे नावं आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वळदगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी (19 मे) सकाळी उघडकीस आली. मोहन डांगर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे याची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहत होते. तसेच शेती करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर गुरुवारी (18 मे) रात्री डांगर कुटुंब जेवण करुन झोपले. तर पूजा याचं सासर माहेर एकाच गावात असल्याने त्यांची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. मात्र शुक्रवारी सकाळी श्रेया घरी आली नसल्याने आजी तिला पाहण्यासाठी मोहन यांच्या घरी आल्या होत्या. दरम्यान घरात पाहताच त्यांना नातीसह तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट....
वाळूज परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मोहन डांगर यांनी पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वतः गळफास घेतला असल्याचं संशय आहे. मात्र पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. असे असलं तरीही मोहन यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र कळू शकले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या: