Gautami Patil show : अवघ्या काही दिवसात राज्यात प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो. आता असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील महालगावात समोर आला आहे. कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या गौतमी पाटीलची एक अदा पाहण्यासाठी लोटलेल्या गर्दीमुळे एका दुकानाचे पत्र्याचे शेड कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरीही काही जण मात्र जखमी झाले आहेत. तर शेड कोसळताच गौतमी पाटीलने नृत्य थांबवत कार्यक्रम गुंडाळला. तर या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका कापड दुकानाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. दुपारी स्थानिक राजकीय पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला होता. तर सायंकाळी लावणी कलाकार गौतमी पाटील ही फीत कापून व तीन गाण्यांवर आपली कला सादर करणार होती. दरम्यान सोशल मीडियातून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्याने परिसरातील युवक व नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
दुकानाच्या बाजूलाच तिला नृत्य करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्याच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका दुकानासमोर पत्र्याचे शेड होते. रस्त्यावर जागा नसल्याने काही बहाद्दर थेट या शेडवर जाऊन बसले. दुसरे नृत्य सुरू असतानाच क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे हा शेडच कोसळला. त्यामुळे नृत्य पाहण्यासाठी बसलेलेही खाली पडले. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. समोरील शेड पडताच गौतमी यांनी आपले ताबडतोब नृत्य थांबवत कार्यक्रम गुंडाळून घेतला. तर शेडवरून खाली कोसळलेले उठून पसार झाले.
व्हिडिओ व्हायरल...
गौतमी पाटीलच्या लावणीची सद्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात होणारी गर्दी लक्षवेधी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी गर्दीमुळे होणाऱ्या राड्याची देखील तेवढीच चर्चा आहे. दरम्यान संभाजीनगरच्या महालगावाच्या कार्यक्रमात देखील गौतमीच्या कार्यक्रमात मोठी गर्दी झाली. बसण्यासाठी जागा नसल्याने तरुण थेट समोर असलेल्या दुकानाचे पत्र्याचे शेडवर जाऊन बसले. मात्र गर्दी अधिक झाल्याने हा शेड अचानक कोसळला. या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Gautami Patil Video : गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चढले दुकानाच्या शेडवर, शेड कोसळून गोंधळ
इतर महत्वाच्या बातम्या:
Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणारा ताब्यात; पुणे पोलिसांना मोठं यश