Chhatrapati Sambhaji Nagar News : अनेकदा आपण नवीन शहरात गेल्यावर संबधित व्यक्तीचा पत्ता शोधण्यासाठी बराच वेळ लागतो, अन्यथा अनेकांना पत्ता विचारावा लागतो. पण यावरच छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तांनी पर्याय शोधून काढला आहे. कारण छत्रपती संभाजीनगर शहरात आता प्रत्येक घरावर एकाच पद्धतीचे डिजिटल ॲड्रेस असायला हवे, त्यासाठी काय करता येईल, याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. ज्यामुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यावर लगेच पत्ता मिळणार आहे. यासाठी लागणारा खर्च नागरिकांकडून वसूल केला जाणार नाही, महापालिका स्वतःसुद्धा निधी वापरणार नाही. सीएसआर अथवा शासनाकडून निधी मिळवून उपक्रम राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.


गेल्या काही वर्षात छत्रपती शहराचा व्याप मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना पत्ता विचारत फिरावे लागते. औरंगपुरा, पिंपळाचे झाड, एखाद्या दुकानाच्या मागील गल्लीत असा पत्ता सांगावा लागतो. प्रत्येक मालमत्तेवर एक डिजिटल अॅड्रेस असेल तर शोध घेणाऱ्याचे काम सोपे होऊ शकते. मोठ्या शहरांमध्ये ही पद्धत वापरण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातही डिजिटल ॲड्रेस पद्धत राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी नागरिकांवर कोणताही अतिरिक्त खर्च पडणार नाही. या पद्धतीमध्ये गुगल मॅपप्रमाणे व्यक्ती थेट संबंधित पत्त्यावर जाऊन उभा राहू शकतो. त्यामुळे कोणतीही पत्ता शोधणे सोपं होणार आहे. 


काय फायदा होणार? 


बाहेरगावून आलेल्या एखाद्या व्यक्तीने तुमचा पत्ता मागितला तर त्याला सविस्तर सांगत बसायची अजिबात गरज राहणार नाही. एक कोड शेअर केला तर समोरचा व्यक्ती क्युआर कोड स्कॅन करून थेट तुमच्या घरासमोर हजर राहील. एखाद्या दुकानातून सामान, खाद्यपदार्थ मागविले तर डिलिव्हरी बॉयला पत्ता शोधायला सोपे जाईल. त्यामुळे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात तुमचे घर असल्यास एका क्लिकवर तुम्हाला ॲड्रेस मिळणार आहे. 


अनेक शहरांमध्ये वापर सुरु...


विशेष म्हणजे जगभरात डिजिटल ॲड्रेसचा वापर वाढतो आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये याचा वापर सुरू आहे. ज्यामुळे ड्रोनद्वारे अचूक पत्त्यावर सामान पाठविण्यात येते. भारतात अलीकडेच काही शहरात डिजिटल अँड्रेसकडे वाटचाल सुरु केली. यामध्ये घर क्रमांक, मालमत्ता क्रमांक, नळ कनेक्शनची माहिती, सिटी सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक, जीपीएस लोकेशन, मालमत्ताधारकाचे नाव आदी माहिती टाकली जाते. ज्यामुळे क्यूआर कोडच्या माध्यमाने मालमत्ता शोधणे अधिक सोपे जाते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमणावर हातोडा; मुकुंदवाडी परिसरातील एकूण 14 दुकाने जमीनदोस्त