Bhagwat Karad On Chandrakant Khaire: राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या हिंसाचाऱ्याच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यावरुनच आता राजकीय वातावरण देखील तापले असून, आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षी मरताना जसे पंखाची हालचाल करतो त्याप्रमाणे चंद्रकांत खैरे संपलेले असून, त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं कराड म्हणाले आहेत. 


यावेळी बोलताना कराड म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांचा अशाप्रकारे आरोप करणे म्हणजेच दिवा जसा विजताना फडफड करतो, पक्षी जेव्हा मरताना जसे पंखाची हालचाल करतो त्याप्रमाणे चंद्रकांत खैरे संपलेले आहे. त्यामुळे काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना शिवसेनेत देखील कोणी विचारत नव्हते. पण त्यांच्यात झालेल्या दोन गटामुळे खैरे यांना जीवनदान मिळाले आहे. तर अंबादास दानवे त्यांच्या कितीतरी पुढे निघाले आहे, असल्याचा टोला कराड यांनी यावेळी लगावला आहे. 


पुढे बोलताना कराड म्हणाले की, चंद्रकांत खैरे त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आरोप आहेत. हिंसाचाराच्या घटना घडवणे हे भाजपच्या कुठल्याही तत्वात बसत नाही. भाजप पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार पक्ष आहे. आमचा पक्ष गोरगरीबांचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करणारा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सध्या जे काही कार्यकर्ते आहेत, विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांचा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी जो काही आरोप केला आहे, तो विचारपूर्वक करायला हवा होता. तसेच संभाजीनगर असो किंवा महाराष्ट्रात कोठेही हिंसाचार होऊ नयेत यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाते. 


भाजप एमआयएमला कधीच सहकार्य करणार नाही 


अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद असल्याने, त्यांना सरकारवर असे काही आरोप करावेच लागतात. एमआयएम हा भाजपचा एक नंबरचं विरोधी पक्ष आहे. त्यांची धोरणं भाजपच्या एकदम विरोधात आहे. त्यामुळे भाजप एमआयएमला कधीच सहकार्य करणार नाही. विचारधारेबाबत भाजप कधीच तडजोड करणार नाही. तर सत्तेसाठी शिवसेनेने आमच्यासोबतची युती तोडून महाविकास आघाडी तयार केली. त्यामुळे चंद्रकांत खैरे असतील किंवा अंबादास दानवे यांना भाजपवर बोलण्याचा अधिकार नाही, असेही भागवत कराड म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chandrakant Khaire : राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप