Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतातील कांद्याच्या चाळीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर यावेळी एकूण 36 लाख 88 हजार 930 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात जुगार अड्डा सुरु असताना स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला याबाबत माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर हद्दीतील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (रा. श्रीकृष्णनगर, गंगापुर) याच्या शेतातील 3000 स्क्वे.फुटाच्या पत्र्याच्या शेडमधील कांद्याच्या चाळीमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती. यावरुन पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि देविदास वाघमोडे यांच्यासह पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करुन छापा मारण्याचे सूचना देऊन रवाना केले.
दरम्यान या कारवाईसाठी वैजापूर इथून आणखी एक पोलीस पथक सोबत घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन श्रीकृष्णनगर, गंगापूर इथल्या ज्ञानेश्वर रंगनाथ यादव याच्या शेताजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा लावला. हा संपूर्ण परिसर अंदाजे जवळपास 11 एकरचा असून, संपूर्ण परिसराला संरक्षण भिंतीसह काटेरी तारेचे फेन्सिंग करण्यात आलेले आहे. या शेतातील प्रवेश करण्यासाठी फक्त एकच गेट असून तो लॉक करुन ठेवण्यात आला होता. तसेच गेट जवळील आत जाण्याचा परिसर 100 मीटरपेक्षा अधिक असल्याने याठिकाणी एक व्यक्ती हा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर देखरेखीकरता ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांची कोणतीही हालचाल लक्षात येताच आतील लोकांना सावध करण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती.
पोलिसांनी जखमांचा विचार न करता शेतात प्रवेश केला
त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पथकातील पोलिसांनी या संपूर्ण परिसराची बारकाईने आणि छुप्या पद्धतीने पाहणी व पडताळणी करुन छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलिसांच्या पथकांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास अंधारात मुख्य प्रवेशद्वाराचे गेट आणि संरक्षण भिंतीवरुन उड्या मारुन शेतात प्रवेश केला. याठिकाणी लावण्यात आलेल्या काटेरी तारेचे फन्सिंगमुळे पोलिसांना आत प्रवेश करताना तारेचे कट शरीरावर लागून जखमा झाल्या. मात्र पोलिसांनी जखमांचा विचार न करता अंधारात शेतात प्रवेश करत गेटपासून काही अंतारवर लोखंडी जाळी असलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत पोहोचले. यावेळी कांद्याच्या चाळीजवळ लपतछपत जाऊन पोलिसांच्या पथकाने पडताळणी केली असता तिथे 15 लोक हे तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना दिसले. त्यामुळे पथकाने अचानक घेराव टाकून छापा टाकला असता यातील 4 जण अंधाराचा फायदा घेऊन बाजूच्या शेतातून पळून गेले. तर इतर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यांना ताब्यात घेण्यात आले...
ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (वय 45 वर्ष रा. श्रीकृष्णनगर,गंगापूर), शिवाजी नारायण खैरे (वय 41 वर्षे रा वळदगाव, पंढरपूर, औरंगाबाद), चंद्रकांत भाऊसाहेब गायकवाड (वय 35 वर्षे रा. गंगापूर), शुभम राधाकृष्ण साळवे (वय 21 वर्षे रा.गंगापूर), मोहसीनअली अब्बास रजवी (वय 33 वर्षे रा. औरंगाबाद), शफिक गुलाम रसूल (वय 21 वर्षे रा.कन्नड), प्रकाश लहूजी खाजेकर (वय 34 वर्षे रा.गंगापुर ), रमेश एकनाथ मोरे (वय 40 वर्षे घोडगाव, गंगापूर), संतोष नामदेव काळे (वय 40 वर्षे रा.गंगापूर), हकिम शेख चाँद (वय 20 वर्षे रा.गंगापूर), दिलीप नामदेव पवार (वय 39 वर्षे रा. गंगापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्या ताब्यातून 3 लाख 36 हजार 230 रुपये रोख तसेच 04 चारचाकी वाहने, 03 दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट 13, जुगाराचे साहित्य असा एकूण 36 लाख 88 हजार 930 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुदाम शिरसाट, देविदास वाघमोडे, पो.उप.नि. श्रीराम काळे, पोलीस अंमलदार सुनिल शिराळे, जावेद शेख, संदीप आव्हाळे, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर, आत्माराम पैठणकर, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, गोपाल जोनवाल यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
VIDEO : मुख्याध्यापकच चोरायचा गोरगरिबांच्या मुलांचा आहार, गावकऱ्यांनी रंगेहाथ पडकले