Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून (ED) नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचं आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरवातीला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढे या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. ज्या कंपन्यांना काम मिळाले होते, त्या कंपनीशी संबंधित लोकांवर ईडीने एकाचवेळी 9 ठिकाणी छापेमारी केली होती. पुढे या प्रकरणात ईडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी देखील केली. दरम्यान आता याच प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे देखील समोर येत आहे.
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान यातील काही कंपन्यांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यामुळे अधिक चौकशी केल्यावर यातील समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जगवार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच ‘आयपी’ अॅड्रेसवरुन निविदा भरल्याचे महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर याच प्रकरणात संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर ईडीने वेगवेगळ्या 9 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर काही अधिकाऱ्यांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. आता तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना देखील नोटीस देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु