Chhatrapati Sambhaji Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असतानाच, इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत सुमारे अडीच वर्षे तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विधवेला लग्नाचे आमिष दाखवत अडीच वर्षे तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्न मात्र दुसरीसोबत केले आहे. त्यामुळे या तरुणाच्या विरोधात सिडको पोलिसात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी तरुण फरार झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहे. शोएब शेख बाबू (वय 24 ,रा. नारेगाव)  असे आरोपीचे नाव आहे.


याबाबत 27 वर्षीय विधवा पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ती दोन मुलांसह राहते. अडीच वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिची आरोपी तरुण शोएबशी ओळख झाली. या ओळखीतून मैत्री होऊन भेटीगाठी सुरु झाल्या. तेव्हा शोएबने तिच्यासोबत लग्न करून, तिच्या दोन्ही मुलांना आधार देण्याचे आमिष दाखविले. यानंतर, बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. असा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरु होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीडिताला भेटत नव्हता. एवढेच नव्हे, तर तो तिचे फोनही घेत नव्हता. शोएब तिच्यापेक्षा वयाने चार वर्षे लहान आहे. यामुळे त्याची अडचण काय आहे, समजून घेण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. दरम्यान शोएबने संपर्क तोडल्याने तिने त्याची अधिक माहिती घेतली. तेव्हा त्याने नुकतेच दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केल्याचे तिला समजले. 


लग्न करून, दोन्ही मुलांना आधार देण्याचे आमिष दाखवत शोएबने अडीच वर्षे बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.  मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याने पिडीत महिलेला धक्काच बसला. आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या प्रकरणी 6 मे रोजी सिडको पोलिस ठाण्यात शोएबविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेवर अत्याचार 


दरम्यान दुसऱ्या एका घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याचं संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझं संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आरोपीने महिलेला स्वतः च्या घरी बोलावले. त्यानंतर विवाहितेला पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटले आहे.  धक्कादायक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल