CM Eknath Shinde Ayodhya Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसह महत्वाच्या नेत्यांसोबत आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. तर यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार अयोध्येत दाखल झाले आहेत. मात्र अयोध्येत पोहचताच शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पिता-पुत्रांवर हल्लाबोल करत टीका केली आहे. मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), दादा भुसे (Dadaji Bhuse), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यासह गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  


कोण काय म्हणाले? 


शंभूराज देसाई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, अयोध्येत मंदिर व्हायला पाहिजे. सर्वात आधी यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनीच आवाज उठवला होता. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी देखील आम्ही प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालो होतो. मात्र आम्हाला विमानतळावरून परत बोलवण्यात आले होते. तेव्हापासून आमचा हा दौरा अपूर्ण रहिला होता. मात्र आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचा दौरा पूर्ण होत आहे. परंतु त्यावेळी आम्हाला अयोध्येत येण्यापासून का रोखण्यात आले याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आम्हाला परत बोलवण्यात आले आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी आम्हाला आमंत्रणच देण्यात आले नव्हते,  असेही देसाई म्हणाले. 


संदिपान भुमरे: गेल्यावेळी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात आम्ही देखील येणार होतो. मात्र विमानतळावर पोहचल्यावर आम्हाला थांबण्याचे निरोप मिळाले. तुम्ही अयोध्येला येऊ नका असा आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही परत आलो होतो. त्यामुळे रद्द झालेला तो दौरा पूर्ण करण्याची मागणी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज दौरा ठरला आणि आज आम्ही रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत आलो असल्याचं संदिपन भुमरे म्हणाले. 


गुलाबराव पाटील: मागच्या दौऱ्यावेळी आम्हाला बोलवण्यात आले नव्हते, मात्र यावेळी बोलवण्यात आल्याने आम्ही जात आहे. त्यावेळी काही कुजबुज नव्हती, पण त्यावेळी आम्हाला बोलवण्यात आले नव्हते. आता आम्ही आलो आहे, कारण आम्हाला आता बोलवण्यात आल्याचा गुलाबराव पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CM Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत, रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार, असा खास असेल आजचा दौरा