Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, उकळते पाणी अंगावर पडून सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी उकळलेले पाणी अंगावर पडून ही चिमुकली जखमी झाली होती. तर तिच्यावर छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान घाटीत उपचारादरम्यान रविवारी (2 एप्रिल) दुपारी दोन वाजता तिचा मृत्यू झाला. प्रतिभा सुभाष खंडागळे (वय 7 वर्षे, पुरी, गंगापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (22 मार्च) रोजी प्रतिभा घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर तापलेले गरम पाणी खाली घेत असतानाच, कडक पाणी तिच्या अंगावर पडले. अंगावर गरम पाणी पडल्याने प्रतिभा गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान जखमी प्रतिभावर उपचार करुन सुट्टी देण्यात आली होती. मात्र तिला पुन्हा त्रास सुरु झाल्याने शनिवारी घाटीत दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


टँकरखाली येऊन तरुणीचा मृत्यू 


दुसऱ्या एका घटनेत वडिलांसोबत स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणीचा मनपाच्या टँकरखाली येऊन मृत्यू झाला आहे. शहरातील बाबा पेट्रोल पंप चौकात सोमवारी (3 एप्रिल) सकाळी साडेसात वाजता हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर जप्त केला. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दीक्षा मधुकर काळे (वय 23 वर्षे, रा. संचेती टॉवर, अश्वमेध कॉलनी, मिलिंद महाविद्यालय गेटसमोर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या तृतीय वर्षात शिकत होती. 


दरम्यान कॉलेजला जाण्यासाठी दीक्षा आणि तिचे वडील मधुकर काळे हे स्कूटीने (क्र. एमएच 20 सीपी 3421) घरातून बाहेर पडले. यावेळी मधुकर काळे हे स्कूटी चालवत होते. तर त्यांची स्कूटी छावणीतील लोखंडी पूल ओलांडून बाबा पेट्रोल पंपाकडे येत होते. याचवेळी नगर नाक्याकडून येणारे मनपाचे रिकामे टँकरने बाबा पेट्रोल पंप चौकात येताच टँकरचालकाने अचानक मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी वळण घेतले. मात्र काळे यांची दुचाकी टँकरच्या जवळ असल्याने त्यांची दुचाकी टँकरच्या मागील बाजूला धडकली. त्यानंतर पाठीमागे बसलेली दीक्षा दुचाकीवरुन उडून खाली पडली, तोच टँकरचे मागील चाक तिच्या डोक्यावरून गेले. ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: मलब्याचा ढिगारा ढासळल्याने पाच मजूर दबले, तिघांचा मृत्यू; छ. संभाजीनगरमधील घटना