Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: आधीच H3H2 नं चिंता वाढवली असताना, छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) पुन्हा कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसताना, आता चार-पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंखेत सातत्याने वाढ झाली आहे. तर शनिवारी तब्बल 17 जणांचे अहवाल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 38 वर पोहचली असून, आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन वाढ होताना दिसत आहे. शनिवारी तर मागील चोवीस तासांत तब्बल 17 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदण झाली. शनिवारी प्राप्त अहवालावरून एकूण कोरोना चाचण्यांतून पॉझिव्हिटी रेट तब्बल 13.82 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. शनिवारी आढळलेल्या 17 नवीन रुग्णांमुळे शहरात सध्या 38 सक्रिय रुग्ण आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना गंभीर लक्षणे नसल्याने घरीच उपचार केले जात आहे.
कोरोना सेंटर सुरू करणार...
छत्रपती संभाजीनगर शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढता असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेल्ट्रॉन रुग्णालयात उपचार सुविधा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. रुग्णालयातील सुविधा आवश्यक असलेल्या कोरोना बाधितांना मेल्ट्रॉनमध्ये हलवले जाणार आहे. तर कोरोना रुग्णाची संख्या अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेत, आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
यापूर्वी छत्रपती संभाजीनगरकरांना कोरोनाचा मोठा सामना करावा लागला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागरिकांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी बाहेर वावरताना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, घरी गेल्यावर हात साबणाने धुणे, लहान मुलांची काळजी घेणे या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
चिंता वाढली!
शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. तर प्रशासनाकडून संशयीत रुग्णांच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी मार्च,एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा इतिहास पाहता आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र असे असले तरीही वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Corona : काळजी घ्या! कोरोना आणि एच3 एन2 चा डबल अटॅक! आरोग्य यंत्रणा सतर्क