Chhatrapati Sambhaji Nagar News : शिवसेनेने (ShivSena) भाजपासोबतची (BJP) युती तोडून राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) जाता राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना पाहायला मिळाला. दरम्यान आजही भाजप आणि महाविकास आघाडीत एकमेकांना होणारा विरोध कायम आहे. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकारणातील नवीन फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या निवडणुकीत चक्क महाविकास आघाडीला भाजपचा गट जाऊन मिळाला आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या या नवीन युतीचा फॉर्म्युला चर्चेत आला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात असणार आहे. मात्र असे असतानाच आता भाजपमध्ये तीन गट निर्माण झाले आहेत. ज्यातील एक महत्वाचा गट महाविकास आघाडीत सामील झाला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजीव डोंगरे यांचा गट महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये सहभागी झाला आहे. तर भाजपचा दुसरा गट हा शिंदेसेनेसोबत आहे. तर तिसरा गट हा इतर पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या या युतीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
शिंदे गटावर नाराजी...
दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी महाविकास आघाडीसोबत युती करताना आपल्याच गटाला अधिकृत भाजपच गट असल्याचा दावा केला आहे. सोबतच त्यांनी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर देखील टीका केली आहे. बोरनारे यांच्याबाबत भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. बोरनारे यांच्याकडून विकास कामापासून भाजपला लांब ठेवण्यात येत आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपेक्षा भाजप आणि महाविकास आघाडीच्या या नवीन युतीचीच अधिक चर्चा पाहायला मिळत आहे.
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो
राज्यात एकीकडे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांनविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. एवढच नाही तर टीका करताना पातळी सोडून बोलले जात आहे. सोबतच शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद देखील टोकाला पोहचले आहे. अशात वैजापूर कृषी बाजार समितीमधील या नवीन युतीमुळे राजकारणात सर्व काही शक्य असते आणि कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! राज्यभरातील मनरेगाच्या कामावर अधिकाऱ्यांचा बहिष्कार; ग्रामीण भागातील कामे खोळंबणार