Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) उमेदवारीसाठी एकेमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यातील वाद अखेर मिटले असून, कालच दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले आहे. दरम्यान, काल मनोमीलन झाल्यावर खैरे यांना निवडणून आणण्यासाठी आता दानवे स्वतः मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी आज अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी खैरे देखील उपस्थित होते. त्यामुळे गुरुला जिंकून आणण्यासाठी शिष्य मैदानात उतरल्याची चर्चा सुरु आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या बैठका घेतल्या जात आहे. अंबादास दानवे यांच्या क्रांती चौक कार्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी घोषित केलेल्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.


लोकसभेतील विजय म्हणून गुरूदक्षिणा देणार...


संभाजीनगरमधील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, असे असले तरीही या दोन्ही नेत्यांमधील नातं गुरु शिष्याचा नातं मानले जाते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना निवडणून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांचा विजयच त्यांच्यासाठी माझी गुरूदक्षिणा असणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले आहेत.  


बैठकीला यांची उपस्थिती...


या बैठकीला माजी आमदार नामदेवराव पवार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पांडुरंग तांगडे पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, विजयराव साळवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शहर अध्यक्ष काँग्रेस शेख युसूफ, जिल्हा कार्याधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस विश्वजीत चव्हाण, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ख्वाजा शरफुद्दीन, लोकसभा समन्वयक प्रदीप कुमार खोपडे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, अभिषेक देशमुख, किशोर बागवाले व संजय वाघचौरे उपस्थित होते.


दोन्ही नेत्यांच्या जनसंपर्काचा फायद होणार? 


चंद्रकांत खैरे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, मात्र असे असले तरीही खैरे यांचा जिल्ह्यात तगडा जनसंपर्क आहे. खासदार नसतानाही ते गेली पाच वर्ष सतत जिल्ह्यात दौरा करतांना पाहायला मिळाले. तसेच, महाविकास आघाडीच्या काळात आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून त्यांनी मोठ्या प्रमाणत विकास निधी आणून लोकांची कामे केली. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा देखील जिल्ह्यात तगडा जनसंपर्क आहे. मागील काही वर्षात त्यांनी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करत पक्षाची ताकद वाढवली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दानवे यांनी ग्रामीण भागात पक्षाची मोठी फळी तयार केली आहे. त्यामुळे खैरे आणि दानवे यांच्या जनसंपर्काचा लोकसभा निवडणुकीत त्यांना किती फायद होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : भागवत कराडांच्या भेटीगाठी वाढताच भुमरेंसह शिवसैनिक शिंदेंच्या भेटीला; संभाजीनगरचा तिढा कायम