Imtiaz Jaleel on Siddhant Shirsat : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मराठवाड्यातील ताकदवान नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप एका महिलेने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे की, एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि आता संबंधित महिलेला धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या महिलेच्या वकिलांमार्फत मुलाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मग यावर सगळे लोक गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर अख्खा मिडिया घरासमोर जमला असता
इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, आम्ही असं काही केलं असतं, तर संपूर्ण मिडिया आमच्या घरासमोर जमा झाला असता. महिला आयोगाकडेही आम्ही विनंती करतो की, तुम्ही या प्रकरणात गप्प बसणार आहात का? आम्ही रुपाली चाकणकर ताईंना हात जोडून विनंती करतो की, ती महिला मुंबईतच राहते, कृपया तिला भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित महिलेने केलेल्या आरोपांनुसार 2018 साली सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. दोघांचे मैत्रीचे संबंध आणखी घट्ट झाले. दोघेही मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरातील एका फ्लॅटवर भेटायचे. चेंबूरच्या फ्लॅटवर सिद्धांत शिरसाट आणि महिलेमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. या शरीरसंबंधांमुळे महिलेला दिवसही गेले होते. मात्र, सिद्धांत शिरसाट यांनी या महिलेला गर्भपात करायला लावला. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावत, सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे. सिद्धांत शिरसाट आणि या महिलेचे 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्नही झाले होते. त्याचे पुरावे संबंधित महिलेकडे असल्याचे तिने म्हटले आहे.
आणखी वाचा