छत्रपती संभाजीनगर: गेल्या दोन दिवसांपासून सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची (Manoj Jarange) भेट घेणार असल्याची चर्चा आहे. अखेर हे शिष्टमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी हे शिष्टमंडळ संभाजीनगरात येणार होतं, मात्र काही कारणामुळे हा दौरा टळला होता. तर, आज सकाळी देखील हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला न आल्याने चर्चेला उधाण आलं होतं. परंतु, अखेर या शिष्टमंडळाचा दौरा ठरला असून, आज संध्याकाळी पाच वाजता मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात हे शिष्टमंडळ पोहोचणार आहे. 


मंगळवारी हे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळ संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून जरांगे यांना देण्यात आली होती. तसेच, बुधवारी हे शिष्टमंडळ येणार असल्याचे देखील सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, आज संध्याकाळी पाच वाजता सरकारचं हे शिष्टमंडळ संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचणार आहे. तेथून जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन शिष्टमंडळा त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि उदय सामंत यांचा समावेश असणार आहे.


दोनदा मुहूर्त देखील हुकला... 


मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, सोमवारी एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती खुद्द जरांगे यांनी दिली होती. मात्र, काही कारणास्तव शिष्टमंडळाचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर 7 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी हे शिष्टमंडळ येत असल्याची माहिती जरांगे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळाचा दौरा पुन्हा रद्द करण्यात आले. त्यानंतर हे शिष्टमंडळ आज सकाळी येणार असल्याची चर्चा होती. परंतु, सकाळी येऊ न शकलेलं हे शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दोनदा मुहूर्त हुकेलेलं शिष्टमंडळ संध्याकाळी पोहचते का? हे पाहणं महत्वाचे असेल. 


शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्ड देण्याची शक्यता


मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा म्हणून, जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी सरकारच्या वतीने टाईम बॉन्डबाबत देण्याचं देखील ठरले होते. त्यानुसार, आज जरांगे यांच्या भेटीला येणारं शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्ड देण्याची शक्यता आहे. ज्यात, जरांगे यांनी उपोषण मागे घेतांना आरक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, यासाठी सरकार काय-काय करणार, आरक्षणाचा आदेश कधी काढला जाईल, तसेच आरक्षण देतांना याच लाभ कुणाला घेता येईल, याबाबत लेखी माहिती असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : अखेर शिंदे समितीचा मराठवाड्यातील अहवाल तयार; उद्या संभाजीनगरात महत्वाची बैठक