छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नेमलेल्या शिंदे समितीच्या आदेशानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे अहवाल आता तयार झालेले आहेत. याबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक मराठवाड्याचे विभागीय आयुक्त यांनी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बोलावलेली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, सापडलेले पुरावे,  प्रमाणपत्र वाटपाची गती या सगळ्या बाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मराठवाड्याच्या या आठही अहवालाचा एकत्रीकरण करून विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे शिंदे समितीला आणि राज्य सरकारला सादर करण्यात येईल. 


मराठवाड्यात कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. आतापर्यंत 1,74,45,432 कागद तपासण्यात आले आहेत. त्यात 14 हजार 976 पुरावे कुणबी जातीचे सापडले आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यात तब्बल 8 हजार 126 गावात हे पुरावे सापडले आहेत. त्यातील 1 हजार 267 गावात गाव नमुना 33 आणि 34 पुरावे सापडले आहेत. एकूण 14 हजार 976 सापडलेल्या नोंदीपैकी 9 हजार 755 कागदपत्र तपासून वेब साईट्सवर 4 हजार 282 कागदपत्र  अपलोड झाले आहेत. तर, रविवारपर्यंत 70 पेक्षा अधिक लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. 


धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 73 नोंदी अढळल्या..


धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी असल्याचे आणखी पुरावे व कागदपत्रे सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 642 पैकी तब्बल 167 गावात मराठा कुणबी असल्याची नोंद सापडली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.  त्यामुळे जिल्ह्यात 167 गावात मराठे हे कुणबी असल्याचे समोर आले आहे. या गावांची नावे व सापडलेले पुरावे, नागरिकांची नावे येत्या 3-4 दिवसात शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जातील. त्यानंतर त्यांनी वंशावळ आणि इतर कागदपत्रे दिल्यास प्रमाणपत्र मिळणार आहे. 167 गावात 614 ठिकाणी घरांच्या आणि जनगणनेच्या नोंदीत मराठा कुणबी अशी नोंद सापडली आहे. यापूर्वी जवळपास 40 लाख कागदपत्रे प्रशासनाने तपासली होती. त्यात 459 नोंदी सापडल्यानंतर आता नव्याने 614 नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आकडा हा 1 हजार 73 झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 22 गावात 122, तुळजापूर तालुक्यातील 35 गावात सर्वाधिक 304, परंडा 21 गावात 3, भुम 29 गावात 29, कळंब 39 गावात 135, वाशी 17 गावात 21 ठिकाणी अश्या 614 ठिकाणी नमुना नंबर 33 व 34 मध्ये मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.


कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती...


शिंदे समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2313946, जालना 1974391, परभणी 2073560, हिंगोली 1214113, नांदेड 1513792, बीड 2233035, लातूर 2073464, धाराशिव 4049131 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. ज्यात एकूण 14976 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhagan Bhujbal : OBC आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी, मंत्री छगन भुजबळ कोर्टात उपस्थित राहणार, काय आहे याचिका?