छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात (Marathwada) दुष्काळ (Drought) जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पवार यांनी केली. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा 10 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे.
रोहित पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी, त्यांनी शेतकऱ्यांना भेटून चारा, जनावरांच्या आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत याबाबत निवेदन देखील दिले. तसेच, दिवाळीच्या आधी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मराठवाड्यात दुष्काळी सवलती लागू कराव्यात
याबाबत ट्वीट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असूनही, केवळ 14 तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केलाय. शिवाय मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं जाहीर केलेलं हेक्टरी 13 हजार रुपयांचं अनुदानही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेलं नाही. राज्यात इतरत्रही अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान व पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. या मागणीचं निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडं दिलं, असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवारांचे विभागीय आयुक्तांना निवेदन...
- मराठवाड्यात पावसाळा कमी प्रमाणात झालेला असल्याने जवळपास संपुर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झालेली आहे.
- नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, पाणी, तसेच शेतीसाठी पाणी याची फार मोठी समस्या मराठवाड्यात निर्माण झालेली आहे.
- पावसाभावी दुबार पेरणी करूनही खरीप हंगामाचा खर्च देखील निघू शकलेला नाही, तर रब्बी हंगाम घेण्यासारखी परिस्थिती नाही.
- मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाउस झालेला आहे. तर आठही जिल्ह्यांमध्ये पैसेवारी 50 पेक्षा कमी आहे. अशी वस्तुस्थिती असतांना देखील शासनाने मराठवाड्यातील 76 पैकी केवळ 14 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद; त्यांना कोणाचे आदेश होते; जाळपोळीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप