Chhatrapati Sambhajinagar: ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा ठणठणाट झाल्याचं दिसून आलंय. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता फुटली. जलवाहिनीला पडलेले भगदाड शोधायला 5 तास तर दुरुस्त करायला 15 तास लागले. त्यामुळं ऐन दिवाळीत शहरातील नागरिकांची मोठीच गैरसोय झाल्याचे दिसत आहे. मनपाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आजचा दिवस जाऊ शकतो. त्यामुळे आज शहरवासीयांना पाणी मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
जलवाहिनी फुटली, भगदाड शोधायला 5 तास!
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटली. विशेष म्हणजे ही जलवाहिनी कुठे फुटली हे शोधायला तब्बल 5 तास लागले. सकाळी जायकवाडी धरणाजवळ पिंपळवाडी येथे फुटलेला भाग सापडला. त्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी 5 वाजता दुरुस्ती संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. तब्बल 15 तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता. वसुबारसच्या दिवशीच नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. मंगळवारी धनत्रयोदशीलासुद्धा पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
दुरुस्तीला लागले 15 तास:
जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आल्यानंतर मनपाला जलवाहिनी कुठे फुटली आहे हे शोधायला तब्बल पाच तास लागले. तिथून पुढे दुरुस्तीचे काम सुरु झाले. जलवाहिनीला पडलेलं भगदाड दुरुस्त करण्यासाठी मनपाला 15 तास लागले. तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद होता. वसुबारस आणि धनत्रयोदशीदिवशी शहरवासियांना पाणीपुरवठा झाला नसल्यानं नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. ऐन दिवाळीत मुख्य जलवाहिनी फुटल्यानं नागरिकांना पाण्याविना रहावे लागले. यामुळे मोठीच गैरसोय ओढावल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पैठणच्या नाथसागरातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा होणारी मुख्य जलवाहिनी पिंपळवाडी येथे फुटल्याचं सांगण्यात आले.
बुधवारी मिळणार नाही पाणी
जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बुधवारचा दिवस लागू शकतो असं सांगण्यात येत आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी या दोन्ही दिवशी छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता. आता आजही शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.