छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने (Damini Squad) केलेल्या एका कारवाईत बालविवाह (Child Marriage) रोखण्यात पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे बालविवाह बाबत माहिती मिळाल्यावर हे पथक स्वतः पाहुणे म्हणून लग्नाच्या मंडपात तब्बल एक तास बसून होते. वधू-वर लग्न मंडपात दाखल होताच पोलिसांनी खात्री केली आणि बालविवाह होण्यापासून रोखले. तसेच, दोन्ही कुटुंबाचे पोलिसांनी समुपदेशन करून समज दिली. 


साध्या वेशात मंडपात बसून असलेल्या दामिनी पथकाने बुधवारी शहरात होणारा एका बालविवाह रोखला. तेव्हा वधूच्या आईने मॅडम, मी धुणी-भांडी करते. दोन मुली आहेत. आजचा जमाना किती वाईट आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी आणि चांगले सोयरिक जुळून आल्यामुळे मुलीचे लग्न लावत होते, असे हात जोडून सांगितले. मात्र, कायद्यानुसार हा गुन्हा आहे, असे समजावून सांगता पोलिसांनी सर्वांचे समुपदेशन केले. आणि हा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले. 


पथक तब्बल तासभर मंडपात बसून 


कन्नड तालुक्यातील नवरदेव आणि पडेगावातील साईनगर, तथागत चौक परिसरातील नवरीचा बालविवाह होत असल्याची खबर दामिनी पथकाला मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक कांचन मिरधे, सहायक फौजदार लता जाधव, अंमलदार संगीता परळकर, अमृता भोपळे, सुरेखा कुकलारे आणि चालक मनीषा तायडे हे साध्या गणवेशात लग्नस्थळी दाखल झाले. मंडप टाकलेला होता. वऱ्हाडी दाखल झाले होते. बाजुलाच स्वयंपाक सुरु होता. मात्र, नवरी अन नवरदेवाला मंडपात यायला काहीसा अवधी होता. पथक तब्बल तासभर मंडपात बसून राहिले. जेव्हा वधू-वर मंडपात आले त्यानंतर पोलिसांनी आपली ओळख देत त्यांना बालविवाह करण्यापासून रोखले. 


दोन्हीकडील पालकांना दामिनी पथकाने नेले पोलीस ठाण्यात...


वधू-वर मंडपात आल्यावर पोलिसांनी दोघांच्या वयाची खात्री केली. मुलीचे 18 आणि मुलाचे 21 वर्षाहून अधिकचे वय हे लग्नायोग्य वय असते. मात्र, पडेगावात होणाऱ्या या लग्नात 15 वर्षांची मुलगी आणि  20 वर्षाच्या मुलाचे लग्न लावले जात होते. त्यामुळे येथे वधू आणि वर दोघेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगितले. तसेच, दोन्हीकडील पालकांना दामिनी पथकाने छावणी ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासमोर हजर करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांचे म्हणणे समजवून घेऊन आपला निर्णय बदलला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Child Marriage : 'या' राज्यात बालविवाह झाल्यास कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही; सरकारचा इशारा