छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain)  कोसळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, असे असतांना आणखी काही दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार 5 ते 7 डिसेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत किमान तापमानात वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अंशाने घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मराठवाड्यात 8  ते 14 डिसेंबरदरम्यान पाऊस कमी असेल आणि कमाल तापमानही कमी राहील. मात्र, याचवेळी 5 ते 7 डिसेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, सॅक, इसो अहमदाबादच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या छायाचित्रानुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झाला आहे. जमिनीतील ओलावा किंचित वाढला आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. शेतातील कोणतीही कामे पावसादरम्यान करू नयेत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.