छत्रपती संभाजीनगर: शहरातील पडेगाव परिसरात बापानेच पोटच्या लेकाच्या डोक्यात फावड्याने मारहाण करून खून (murder) केल्याची केल्याची घटना घडली. दररोज दारू पिऊन वडिलांना सतत शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशा घटनांनी त्रस्त झालेल्या वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश राजू उफाड (वय 25 वर्षे, रा. पडेगाव) असे मयताचे नाव असून. राजू उफाड असे हत्या करणाऱ्या संशयित आरोपी वडिलांचे नाव आहे. 


मुलाच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पडेगाव परिसरात राजू उफाड हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. उफाड यांच्या कुटुंबात राजू, त्याची पत्नी आणि दोन मुले असे राहतात. मुलीचे लग्न झालं आहे. राजूचा मोठा मुलगा मजुरी करतो, तर लहान मुलगा आकाश हा काहीच कामधंदा करत नव्हता. सोबतच तो प्रचंड दारूच्या आहारी गेलेला होता. त्यामुळे आकाश घरी येताना दररोज दारू पिऊन येत. त्यानंतर घरात धिंगाणा सुरू होत होता. वडिलांना शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे हे प्रकार त्याने सुरू केले होते. अनेकदा समजून सांगून देखील आकाशच्या सवयीत कोणताही बदल होत नव्हता. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून वडिल राजूने आपला मुलगा आकाश याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. 


महालक्ष्मीनिमित्त गुरुवारी राजूची पत्नी, मोठा मुलगा हे मुलीच्या घरी गेले होते. घरी राजू आणि लहान मुलगा आकाश दोघेच होते. दरम्यान, गुरुवारी रात्री पुन्हा आकाश दारू पिऊन आला आणि त्याने वडिलांसोबत वाद घातला. दररोजचा त्रास राजूला असह्य झाला. त्यामुळे रात्री संधी मिळताच त्याने आकाश घरा समोरच्या रूममध्ये बाजीवर असताना फावड्याने आकाशवर हल्ला केला. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. 


हावभावावरुन पोलिसांना संशय आला आणि गेम फसला


आकाशची हत्या केल्यावर या घटनेची माहिती सकाळी राजूने पोलिसांना दिली. मात्र, त्याने ही हत्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने व त्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आकाशचा मृतदेह घाटीत हलविला. त्यानंतर वडील राजू यांना तक्रार देण्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी संशयित जाणवल्या. सोबतच फिर्यादी असलेल्या राजूच्या अंगावर जखमा दिसून आल्या. तर, त्याचे हावभावावरुन त्याचा खुनामध्ये काहीतरी हस्तक्षेप असल्याचे पोलिसांना संशय आला. तसेच, तो पोलिसांना प्रत्येक वेळी वेगवेगळी व विसंगत अशी माहिती देत होता. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत अधिकची विचारपूस केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. 'माझा मुलगा मला दररोज दारुच्या नशेत अश्लील भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करत असे, मी त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलो होतो. त्यामुळे हत्या केल्याची आरोपी राजूने कबुली दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : अल्पवयीन अविवाहित मुलीने दिला बाळाला जन्म; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल